नीरज राऊत

कातकरी, गोंड समाजातील बालकांसाठी योजना; कुपोषण, बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न

पालघर जिल्ह्य़ातील कातकरी आणि गोंड समाजातील बालकांना पूर्वशालेय शिक्षण घेता यावे आणि पोषक आहार व आरोग्य सेवांपासून ते वंचित राहू नये यासाठी ‘फिरत्या अंगणवाडय़ा’ हा अभिनव प्रयोग राबवण्यात येणार आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू यांना आळा बसावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

विशिष्ट असुरक्षित अनुसूचित जमातींसाठी शासनाकडून विशेष आर्थिक तरतूद करण्याची मुभा असून २०१८-१९ या आर्थिक वर्षांसाठी स्थलांतरित करून आलेल्या विशेषत: कातकरी मुलांसाठी फिरती अंगणवाडी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी ही फिरती अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे प्रस्तावित असून प्रायोगिक तत्त्वावर २५ अंगणवाडय़ांचा समावेश करण्यात येणार आहे. या एकंदर प्रकल्पाला दोन कोटी १२ लाख रुपये खर्च होणार आहे.

राज्यातील विविध तालुक्यांतून तसेच जिल्ह्य़ातील जव्हार व मोखाडा भागांतून स्थलांतरित होणाऱ्या कातकरी व गोंड समाजातील बालकांना अंगणवाडीच्या सुविधा मिळाव्यात यासाठी वसई व वाडा तालुक्यात प्रत्येकी आठ, पालघर-विक्रमगड तालुक्यात प्रत्येकी तीन, जव्हार दोन आणि तलासरी येथे एक अंगणवाडी फिरत्या स्वरूपात स्थापन करण्यात येणार आहे. या योजनेसाठी फिरती परिपूर्ण अंगणवाडीची किंमत अंदाजे प्रत्येकी आठ लाख रुपये अपेक्षित असून सेविकांचे मानधन परिवर्तनीय निधी यांचा एकंदरीत खर्च पाहता या प्रकल्पाला दोन कोटी ११ लाख रुपये खर्च होणार आहे. या फिरत्या अंगणवाडय़ा १५ जूनपर्यंत कार्यरत राहणार आहेत.

कातकरी समाजातील स्थलांतरित कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळावा, यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर रोजी यासंदर्भात विशेष सभेचे आयोजन केले होते. पालघर जिल्ह्य़ातील विशेषत: कातकरी समाजातील बालके पूर्वशालेय शिक्षण, आहार व आरोग्य अशा सेवेपासून वंचित राहू नये तसेच बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रकार रोखण्यासाठी ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येईल, असे या सभेत ठरले. या फिरत्या अंगणवाडय़ांसाठी स्थलांतरित कुटुंबातील महिलांनाच अंगणवाडी सेविका म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काम देण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या फिरत्या अंगणवाडीमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांना पूर्वशालेय शिक्षण, आरोग्य व पोषण आहार देण्याची जबाबदारी या अंगणवाडी सेविकांवर असेल.