औद्योगिक क्षेत्रात ७० ते ७५ टक्क्यांची पाणीकपात; साडेपाच हजार उद्योजकांना फटका

पाणीटंचाईमुळे होरपळणाऱ्या उद्योगांना पाण्यासाठी दिवसेंदिवस संघर्ष करावा लागत असून सलग दुसऱ्या आठवडय़ातही पाणीटंचाईचा सामना कारखानदारांना करावा लागला. पहिल्या आठवडय़ात ४० टक्के पाणीटंचाईचे वेळापत्रक असताना हे प्रमाणे ९० ते १०० टक्के पाणी कपातीपर्यंत पोहोचल्याने उद्योजकांवर कारखाने बंद ठेवण्याची वेळ आली होती. त्यानंतर परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना दुसऱ्या आठवडय़ातही पाणी कपातीचे प्रमाण ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पोहचल्याने पाणी संकट अधिक गहिरे होऊ लागले आहे. विशेष म्हणजे औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात कूपनलिका अथवा अन्य मार्गाने जमिनीतून पाणी काढण्यास र्निबध असल्याने उद्योगांची पाणी कोंडीच झाली आहे.

औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांच्या पाणी कपातीचा निर्णय झाल्याने ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्य़ातील साडेपाच हजारांहून अधिक उद्योजकांना त्याचा फटका बसला आहे. गेल्या आठवडय़ात ६० तास पाणी बंदचे वेळापत्रक असताना १०० टक्क्यांपर्यंत पाणी बंद झाल्याने उद्योजक चिंतातुर झाले होते. हीच चिंता दुसऱ्या आठवडय़ातही कायम असून या आठवडय़ात सुमारे ७० ते ७५ टक्क्यापर्यंत पाणी कपात झाली आहे. त्यामुळे उत्पादनाला लागणारे किमान पाणी सुद्धा उपलब्ध होत नसल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे. वागळे इस्टेट परिसरातील औद्योगिक वसाहत प्रामुख्याने महिती तंत्रज्ञान (आयटी) आणि अभियांत्रिकी (इंजिनीअरिंग) क्षेत्रातील असून या भागात उत्पादनासाठी पाण्याची अवश्यकता नसते. मात्र तेथे कार्यरत असलेल्या मनुष्यबळासाठी आवश्यक पाणीसुद्धा उपलब्ध होत नसल्याचे खंत येथील उद्योजक व्यक्त करत आहेत. पाणी साठवण्यासाठी मोठय़ा क्षमतेच्या टाक्यांची व्यवस्था करण्यात आली असली तरी पाणी साठवण्याइतकेसुद्धा पाणी मिळत नसल्याचे येथील उद्योजक सांगत आहेत. त्यात औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये बोअरवेल सारख्या कृत्रिम मार्गातून पाणी काढण्यास र्निबध असल्याने उद्योगांना पाण्याचे इतर स्रोतही नसल्याचा फटका सहन करावा लागत आहे.

गेल्या चाळीस वर्षांमधील उद्योगांसाठीची सगळ्यात भीषण अशी ही पाणीटंचाई असून त्यामुळे चार ते पाच दिवस फटका बसत आहे. उद्योगांसाठीचा एकूण पाण्याचा कोटाही कमी झाल्याने उद्योगांमध्ये निराशेची भावना आहे.

– संदीप पारीख, उद्योजक

औद्योगिक विकास महामंडळाने जाहीर केलेल्या वेळेपेक्षा किती तरी आधी पाणी बंद होते. तर सांगितलेल्या वेळेपेक्षा अधिक उशिराने पाणी सुरू केले जाते. त्यामुळे ठरलेले वेळापत्रकही पाळले जात नसल्याने उद्योजकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

– एकनाथ सोनावणे, कार्यकारी सचिव, ठाणे लघु उद्योग संघटना

पाणीटंचाईचा फटका सगळ्या औद्योगिक क्षेत्राला बसत असून उन्हाळा सुरू झाल्यानंतर पुढचे चार महिने कसे काढायचे? असा प्रश्न सगळ्या उद्योजकांना पडला आहे. प्रशासनाकडून २५ टक्के पाणी कपातीचे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत पाणी कपात केली जाते. हे भयंकर आहे.

– मधुसूदन खांबेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन

पाणीटंचाईची झळा यंदा पहिल्यांदाच मोठय़ा प्रमाणात आमच्या उद्योगाला सहन करावी लागली आहे. पाणी येत नसल्याने आठवडाभर उत्पादन बंद ठेवण्याची वेळ गेल्या दोन आठवडय़ांपासून येत आहे.

– सुनील करंदीकर, उद्योजक, श्री योगेश्वर नायलॉन प्रायव्हेट लिमिटेड