News Flash

ग्रामीण भागात पाणीटंचाई, शहरी भागात पाण्याचा अपव्यय

ग्रामीण भागातील रहिवाशांना पाणी मिळत नाही, असे असताना पाण्याची गळती होत आहे

(संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

पाणीगळती होत असल्याने लाखो लिटर पाणी वाया; वसई-विरार महापालिकेचे दुर्लक्ष

वसई : वसई तालुक्यामधील ग्रामीण भागातील रहिवाशांना उन्हाळय़ामुळे तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, मात्र दुसरीकडे वसई-विरार शहरी भागात पाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे चित्र आहे. पर्यावरणाबाबत सजग असल्याचा दावा करणारी वसई-विरार महापालिका पाणीप्रश्नाकडे किती गांभीर्याने लक्ष देत आहे, हे यातून दिसून येत आहे. अनेक ठिकाणी सातत्याने पाणीगळती होत असल्याने सामान्य रहिवाशांनी महापालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

वसई तालुक्यातील कामण, बेलकड, टेपाचा पाडा, देवदळ, सागापाडा, चिंचोटी, कोल्ही, सातिवली, गिदराईपाडा, सागापाडा, खुताडीपाडा, गांजाडीपाडा, उंबरपाडा, वहिल्यापाडा, जिभलं पाडा, वाण्याचा पाडा यांसह अनेक गावात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर काही गावांतील महिलांना पाण्यासाठी दूर पायी जावे लागत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईची इतकी भीषण परिस्थिती असताना शहरी भागात पाणीगळती होण्याचे प्रकार वाढत आहे.

वसईत शंभर फूट रोडवर काही दिवसांपूर्वी पाण्याचा व्हॉल्व्ह सुरू राहिल्याने मुख्य रस्त्यावर पाणी झाले होते. हीच परिस्थिती सोमवारी सकाळी वसई पश्चिमेकडील साईनगर येथे पाहायला मिळाली. सकाळपासूनच पाण्याची गळती सुरू होती. काही नागरिक या पाण्याचा वापर तोंड धुणे, पाय धुणे यासाठी करत होते तर काही जागरूक नागरिकांना पाणी वाया जात असल्याचे पाहून महापालिकेला कळवण्याचा प्रयत्न केला. सकाळी या भागात पाणी वितरित करण्यासाठी व्हॉल्व्ह सुरू केला, मात्र तो व्यवस्थित न झाल्याने कारंज्यासारखे पाण्याचे फवारे मुख्य रस्त्यावर उडत होते. गेल्या आठवडय़ात नालासोपारा पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळ जलवाहिनीला गळती लागल्याने रस्त्यावर पाणी साचले होते

ग्रामीण भागातील रहिवाशांना पाणी मिळत नाही, असे असताना पाण्याची गळती होत आहे याबाबत महापालिकेने उपाययोजना केली पाहिजे, जेणेकरून पाण्याचा योग्य वापर करता येईल, असे काही नागरिकांनी सांगितले.  साईनगर येथे व्हॉल्व्हमधून गळती झाल्याचे समजताच सहाय्यक आयुक्त राजेश घरत आणि अभियंता आर. के. पाटील यांनी पाणी विभागाचा कर्मचारी पाठवून व्हॉल्व्ह व्यवस्थित बंद केला जाईल असे सांगितले.

पालिकेचे सर्वेक्षण सुरू

जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढल्याने ते रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. याबाबतचा वसई-विरार महापालिकेने सव्‍‌र्हेक्षण सुरू केले आहे. एडीसीसी या नागपूरच्या कंपनीमार्फत पालिकेने वसई-विरार परिसरातील पाण्याचा गैरवापर, पाणीचोरी ज्या भागात होते त्याची माहिती सध्या गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. हे सव्‍‌र्हेक्षण अंतिम टप्प्यात  आहे. या माहितीच्या आधारे पाणी नक्की कुठे मुरते याचा छडा लावण्यास पालिकेला मदत होणार आहे. दिवसाला किती पाणी वाया जाते, त्यावर काय उपाययोजना करण्यात येईल हेही सर्वेक्षणानंतर ठरवण्यात येणार असल्याचे पालिका पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंधरवडय़ातील पाणीगळती

२९ एप्रिल : वसई पश्चिमेकडील साईनगर येथे जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी वाया गेले.

२५ एप्रिल : नालासोपारा पूर्वेला रेल्वे स्थानकाजवळच्या परिसरात जलवाहिनीला गळती लागल्याने पाणी रस्त्यावर साचले होते. त्याचा त्रास वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना झाला.

१८ एप्रिल : वसईत शंभर फूट रोड भागात पाण्याचा व्हॉल्व्ह सुरू राहिल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2018 2:23 am

Web Title: water scarcity in rural areas wastage of water in urban areas
Next Stories
1 दाऊदची माहिती मिळविण्यात पोलीस अपयशी
2 नवऱ्यानेच बायकोवर बलात्कार करुन तिची हत्या केली, पत्नीवर प्रेमसंबंधांचा होता संशय
3 निसर्गाच्या कुशीत ठाणेकरांचे आरोग्य धडे!
Just Now!
X