ठाणे महापालिकेने स्वत:च्या योजनेतील जलवाहिनीच्या देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतल्याने बुधवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला असतानाच गुरुवारी ठाणे आणि भाईंदर या दोन्ही शहरांच्या एकत्रित जलवाहिनीत बिघाड निर्माण झाल्याने ठाण्यातील अनेक भागांवर गेल्या तीन दिवसांपासून पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. जलवाहिनीतील बिघाड दूर करण्यासाठी स्टेम प्राधिकरण आणि महापालिकेने स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा बंद केल्याने बुधवारपासून बंद झालेला पाणीपुरवठा शुक्रवारी सायंकाळपर्यंत सुरळीत झाला नव्हता. शुक्रवारी काही भागांत अतिशय कमी दाबाने पाणीपुरवठा केला गेला. मात्र, तीन दिवस शहरातील अध्र्याअधिक भागांवर पाणीबाणी ओढवल्याचे चित्र होते.
ठाणे महापाालिकेच्या जलवाहिनीद्वारे शहरातील विविध भागांना दररोज २१० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी महापालिकेने बुधवारी या भागांतील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. गुरुवारी दुपारनंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे पालिकेने याबाबत सांगितले होते. मात्र, गुरुवारी टेमघर भागात ठाणे आणि भाईंदर पालिकांच्या एकत्रित जोडलेल्या जलवाहिनीवरील प्लेट तुटल्या. त्याच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी दिवसभर स्टेम प्राधिकरणाने आणि महापालिकेने स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा बंद केला. त्यामुळे गुरुवारीही अनेक भागांत टिपूसभरही पाणीपुरवठा झाला नाही. दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे शुक्रवारी सायंकाळपर्यंत अनेक भागांत कमी दाबाने पुरवठा होत होता.
या भागांना फटका
महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून ठाणे शहर, पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, उथळसर, नौपाडा, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, इंदिरानगर, श्रीनगर, शास्त्रीनगर, सुरकरपाडा, जॉन्सन, इटर्निटी, सिद्धेश्वर, वृंदावन, श्रीरंग, चरई, कळवा, खारेगाव, रेतीबंदर, मुंब्रा, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, आझादनगर, डोंगरीपाडा, ओवळा, वाघबीळ, माजीवाडा, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, ब्रह्मांड, पवारनगर, टिकूजिनीवाडी, विजयनगरी व खारटन रोड आदी भागांत पाणीपुरवठा करण्यात येतो, तर स्टेम प्राधिकरणामार्फत होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन घोडबंदर रोड परिसर, बाळकुम, ढोकाळी, कोलशेत, पवारनगर, खारटन रोड, महागिरी, साकेत कॉम्प्लेक्स आदी भागांत महापालिका करते. या भागांना सलग दोन दिवस पाणीपुरवठा बंद असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. बुधवारी पाणी येणार नसल्याचे महापालिकेने कळविल्यामुळे अनेकांनी घरातील पाणीसाठय़ाचे नियोजन केले होते. मात्र, गुरुवारी पाणी न आल्याने घरातील पाणीसाठय़ाचे नियोजन कोलमडून पडले.

गुरुवारी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करीत असतानाच ठाणे आणि मीरा-भाईंदर महापालिकांच्या एकत्रित जलवाहिनीवरील प्लेट तुटल्याने मीरा-भाईंदरचे पाणी ठाण्याच्या जलवाहिनीकडे वळले होते. या प्लेटच्या दुरुस्तीच्या कामाकरिता स्टेम प्राधिकरणाने आणि महापालिकेने स्वत:च्या योजनेतील पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हे काम आता पूर्ण झाले असून शहराचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येत आहे.
– रवींद्र खडताळे, ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाचे उपनगर अभियंता