खोलसापाडा धरणाचे पाणी आणण्याची योजना; ११० कोटी खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी

वसई-विरार शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महापालिकेने उसगाव येथील खोलसापाडा या धरणातील पाणी आणण्याची योजना बनवली आहे. यासाठी महापालिकेने लघुपाटबंधारे योजनेंतर्गत खोलसापाडा येथील धरण आरक्षित करून या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिकेला आणखी एक नवीन धरण मिळणार असल्याने नागरिकांची पाण्याची समस्या मिटणार आहे.

वसई-विरार भागात अजूनही अनेक भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पाणीप्रश्न सुटला पाहिजे यासाठी पालिकेमार्फत विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. याच पाश्र्वभूमीवर खोलसापाडा धरण आरक्षित करून त्याचा वापर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे.

सध्या वसई-विरार शहराला सूर्या, उसगाव, पेल्हार, पापडखिंड या धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. आता नव्याने तयार करण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असल्याने शहराला अतिरिक्त पाण्याचा पुरवठा करता येणार आहे. तसेच या धरणामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ६९ गावांच्या योजनेसाठी २१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध करून देणेही पालिकेला शक्य होणार आहे. त्यामुळे खोलसापाडा १ या प्रकल्पाच्या कामासाठी एकूण ११० कोटी इतक्या खर्चाची गरज असून त्यासाठीच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी दिली आहे. तर पुढील मंजुरीसाठी पाटबंधारे विकास मंडळाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. तेथून मंजुरी मिळाल्यांतर हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला जाईल. या प्रकल्पाची संपूर्ण मालकी आणि या धरणातील पाणी पालिकेसाठी आरक्षित राहणार आहे. तर या प्रकल्पातून उचलण्यात येणारे पाणी स्वामित्व धन महापालिकेकडून घेऊ  नये आणि यावर पाटबंधारे विभाग फक्त प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून काम पाहील या अटी व शर्तीनुसार हा प्रकल्प घेण्यासाठीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात

येणार आहे. या योजनेतून शहरातील पाण्याचा प्रश्न सुटणार असून या योजनेच्या माध्यमातून पाण्याची साठय़ाची व्याप्ती ही ७.८० चौरस किलोमीटर असून या क्षेत्रात एकूण पाणीसाठा १३ हजार ६४ दशलक्ष घनमीटर असेल. त्यातून पिण्यासाठी १२.८१८३ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार होईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

सध्याचा पाणीपुरवठा

वसई-विरार शहराला दररोज २३१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा महापालिकेमार्फत केला जातो. त्यामध्ये सूर्या धरण टप्पा १ व ३ मधून एकूण २०० दशलक्ष लिटर, उसगाव २०,  पेल्हार १०, पापडखिंड एक अशा प्रकारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच महापालिकेने शहराला मुबलक पाणी मिळावे यासाठी खोलसापाडा धरण आरक्षित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तर याआधी सातिवली, तिल्हेर, राजावली या भागातही साठवण तलाव निर्मिती करण्यासाठीची शासनाने मंजुरी दिली आहे. मात्र वन विभागाची जागा संपादनाच्या अभावी ते प्रलंबित आहेत. जर खोलसापाडा एक व दोन असे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाले तर शहराला त्यातून दररोज ७० दशलक्ष लिटर पाणी मिळू शकेल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

वसई-विरार शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खोलसापाडा येथे धरण आरक्षित करण्यात यावे यासाठी महासभेने मंजुरी दिली आहे. आता यानंतरची पुढील प्रक्रिया पूर्ण करून हा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येईल.  – माधव जवादे, शहर अभियंता, महापालिका