वसई-विरार शहरात पाण्याची तीव्र टंचाई असताना तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे दिसून आले आहे. वसई पश्चिमेला असलेल्या तामतलाव येथे एका तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र ते करत असताना तलावातील पाणी थेट नाल्यात सोडले जात आहे

वसई तालुक्यातील पश्चिमपट्टा हा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये पाण्याचा साठा मुबलक प्रमाणात आढळतो. अल्प प्रमाणात झालेल्या पावसाने आणि पाणी उपसामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. याचा परिणाम वसई-विरार भागातील पाण्यावरही झाला आहे. वसई, तामतलाव येथील तलावाच्या सुशोभीकरणाचे काम वसई-विरार महापालिकेकडून सुरू आहे. त्यासाठी तलावातील हजारो लिटर पाण्याचा उपसा करून ते गटारात सोडण्यात आले आहे.

या परिसरामध्ये हा एकच तलाव आहे. आजूबाजूच्या परिसराला या तलावामार्फत पाणीपुरवठा होतो. या ठिकाणी असलेल्या विहिरी, बोअरवेलच्या पाण्यावर या पाणी उपासाचा परिणाम होऊ  शकतो. मुख्य म्हणजे तलावातील पाणी कमी झाल्यास या तलावात असलेल्या शेकडो माशांवर त्याचा परिमाण होऊन ते मृत होतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.