News Flash

दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही काय करणार?

सहामाही परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे याचे वेध लागतात

सहामाही परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीत काय करायचे याचे वेध लागतात. दिवाळी चार दिवसांची असली तरी सुट्टी मात्र चांगली १५ ते २० दिवसांची असते. त्यामुळे उर्वरित वेळेत निवडलेल्या करिअरला पोषक ठरेल, असा एखादा उपक्रम अथवा प्रशिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा प्रयत्न असतो. पूर्वी इतके काटेकोर नियोजन नसायचे. मात्र आता प्रत्येक दिवसाची नीट आणखी विद्यार्थी करू लागले आहेत. अर्थातच त्यात मौजमजा आणि पिकनिकसाठीही वेळ राखून ठेवलेला असतो. कुणी ट्रेकिंगला जात असते. यंदाची दिवाळीच्या सुट्टीत त्यांनी कोणकोणते बेत आणलेत, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’ने काही निवडक विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या.

स्वकमाईने दिवाळी साजरी करणार
मी माझी यंदाची दिवाळी स्व-कमाईवर साजरी करणार आहे. या दिवाळीच्या सुट्टीमध्ये मी काहीतरी काम करून आलेल्या पैशातून माझ्या कुटुंबीयांवर येणाऱ्या दिवाळी खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पालक आपल्या पाल्याच्या आनंदासाठी दिवसरात्र मेहनत करीत असतात. दिवाळीच्या सुट्टीमध्ये मिळालेला वेळ हा कोणत्याही प्रकारे वाया न घालवाता तो सार्थकी लावण्यासाठी मी नोकरी करणार आहे.
– प्रिया उत्तेकर, के.बी. महाविद्यालय, कोपरी ठाणे (पू.)

संगीत शिकणार
नुकतीच परीक्षा संपून दिवाळीची सुट्टी लागली आहे. कॉलेज आणि क्लासच्या गडबडीमध्ये छंद जोपासण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे मी या सुट्टीमध्ये संगीत शिकणार आहे. मला संगीताची फार आवड आहे. दिवाळी सुट्टीच्या निमित्ताने भरपूर मोकळा वेळ मिळाला आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्याचे मी ठरवले आहे.

– अमितेश दळवी, ज्ञानसाधना महाविद्यालय

सामाजिक कार्य करणार
जनजागृतीचे काम करणार आहे. दिवाळी हा आनंदाचा सण आहे, परंतु फटाके फोडून प्रदूषण करून त्याचे आनंदामध्ये विरजन घालू नका, असा संदेश मी आणि माझे मित्रमंडळी लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. ‘ग्रीन दिवाळी’ म्हणून साजरी करण्याचा आमचा मानस आहे. जनसामान्यांना फटाक्याची स्पर्धा करू नका असा संदेश देणार आहोत. तसेच कर्णबधिर मुलांसाठी कागदाचे कंदील तयार करून त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी निधी संकलन करणार आहोत.
– ओनिल कुलकर्णी, निर्मला निकेतन

वाचन करणार
दिवाळीची सुट्टी म्हटली की पूर्वी केवळ ती स्वत:पुरती साजरी करायचो. लहानपणी फटाक्यांचे आकर्षण होते, पंरतु आता कळत्या वयामध्ये या सुट्टीचा सदुपयोग झाला पाहिजे असे वाटते. पूर्वी शाळेत दिवाळीचा अभ्यास दिला जायचा. त्यामुळे थोडेफार वाचन होत असे. मात्र कॉलेजमध्ये आल्यावर या गोष्टींकडे दुर्लक्ष होत गेले. त्यामुळे यंदाच्या सुट्टीत काहीतरी वाचन करायचे ठरविले आहे. सुट्टीमध्ये मनोरंजनासोबतच पुस्तकांच्या सान्निध्यात सुट्टी घालवली, तर ज्ञानात भर पडेल.
-पूर्वा जाधव, वझे केळकर महाविद्यालय, मुलुंड

फराळ करण्यात आईला मदत
आजच्या व्यस्तपणाच्या काळातही आमच्याकडे घरी फराळ बनवण्याची पद्धत आहे. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये मला फराळात आईला मदत करायला खूप आवडते. हा माझ्यासाठी एक शॉर्ट टर्म ट्रेनिंग कोर्सचं असतो. त्यामुळे मला नवे पदार्थ शिकता येतात. फराळासोबतच रांगोळी काढायला मला आवडते. ‘संस्कार भारती’ पद्धतीचा फ्यूजन करून रांगोळी काढण्याचा नवा प्रकार रांगोळ्यांत हल्ली पाहायला मिळतो. – आशा पाटील, विद्यार्थिनी, गोवेली महाविद्यालय

आवाजविरहित फटाके वाजविणार
शहरात आल्याने गावाकडची दिवाळी अनुभवता येत नाही. मात्र दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये गावाकडचे नातेवाईक आणि जवळच्या लोकांसोबत दिवाळी साजरी करायला मला आवडते. एरवी व्हाट्सअ‍ॅप व फेसबूकच्या माध्यमातून चुलत-मामे भाऊ-बहिणी, काका-काकी संपर्कात असतातच. मात्र सणांच्या काळात त्यांना भेटून दिवाळी साजरी करणे मला अधिक आवडते. फटाक्यांचे कर्णकर्कश आवाज मला आवडत नसल्याने मी सहसा आवाज न करणारे फटाकेच उडवतो. त्याचीही एक वेगळीच मजा असते. लहाणपणी किल्ले बनवायचो.
– देवेंद्र जाधव- विद्यार्थी, गोवेली महाविद्यालय
बदलापूरच्या पूजा शिर्केची राज्यस्तरीय कुस्तीसाठी निवड

बदलापूर, प्रतिनिधी
भिवंडी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे २४ व २५ ऑक्टोबरला घेण्यात आलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत १७ वर्षांखालील व ५८ किलो वजनी गटात बदलापूरच्या पूजा शिर्केने चांगली कामगिरी केली आहे. योगी श्री अरविंद गुरूकुल शाळेची विद्यार्थिनी असलेल्या पूजाने अंतिम सामन्यात चुरशीची लढत देत हा विजय संपादन केला. ती हिंगोली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय आंतर शालेय कुस्ती स्पर्धेत ५८ किलो वजनी गटात ठाण्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. अशी माहिती प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 12:35 am

Web Title: whats your plan for diwali
Next Stories
1 अतुल जाधवचे राष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश
2 भ्रष्ट अधिकाऱ्यांना तडाखा!
3 भाईंदरमधील धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष
Just Now!
X