किरकोळीत मात्र प्रतिकिलो २० ते ४० रुपये

मागणीच्या तुलनेत आवक रोडावल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून महागलेल्या टोमॅटोचे दर आता घसरू लागले आहेत. बंगळूरु आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची आवक मोठय़ा प्रमाणात होऊ लागली असून घाऊक बाजारात ते सहा ते आठ रुपये किलो इतक्या स्वस्त दरात विकले जात आहेत. तरीही आकार आणि दर्जाचे कारण पुढे करीत किरकोळ विक्रेत्यांनी नफेखोरीचा मार्ग अवलंबल्याने किरकोळ बाजारात टोमॅटो प्रतिकिलो २० ते ४० रुपये दरानेच विकला जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून टोमॅटोला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी टोमॅटोची कमी लागवड केली. त्यामुळे टोमॅटोच्या दरांनी अचानक मुसंडी मारली होती. दोन महिन्यांपूर्वी आवक घटल्याने घाऊक बाजारात २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री करण्यात येत होती.

बंगळूरुमधून होणारी टोमॅटोची आवकही तुरळक होती. याचा परिणाम किरकोळ बाजारातील टोमॅटोच्या किमतींवर झाल्याने गेले काही महिने किमती स्थिर होत्या. मात्र गेल्या दोन आठवडय़ांपासून पुन्हा घाऊक बाजारात टोमॅटोची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे.

कल्याण कृषी उत्पन्न बाजारात एरवी ८० ते ९० क्विंटल टोमॅटोची आवक होते. गेल्या दोन दिवसांपासून घाऊक बाजारात २८६ क्विंटल एवढी विक्रमी आवक झाल्याची माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे यशवंत पाटील यांनी दिली. सातारा, सांगली, पुणे, नाशिक, विटा या भागांतून टोमॅटोची आवक सुरू झाली आहे. सध्या बंगळूरु आणि मध्य प्रदेशातून टोमॅटोची मोठी आवक होत आहे, असेही त्यांनी सांगितले.

घाऊक बाजारात टोमॅटो कमालीचा घसरला असला तरी किरकोळ बाजारात त्याचे दर २० ते ४० रुपये प्रतिकिलोदरम्यानच आहेत. त्यामुळे घाऊक दरांच्या तुलनेत किरकोळ बाजारात दरात फारशी घसरण झालेली नाही.

अन्य भाज्यांचे दर स्थिर

भाज्यांच्या किमती स्थिर आहेत. समाधानकारक पावसामुळे श्रावणाच्या सुरुवातीला भाज्या स्वस्त झाल्या होत्या, मात्र दोन दिवसांपासून भेंडी, वांगी, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसारख्या भाज्यांचे दर स्थिरावले आहेत. घाऊकच्या तुलनेत किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरामध्ये मोठी तफावत दिसत आहे. कल्याण बाजारात १२ रुपये किलो असलेली भेंडी डोंबिवलीच्या किरकोळ बाजारात मात्र ६० रुपयांना विकली जात आहे. तर १५ रुपये किलो असलेल्या फ्लॉवरलाही किरकोळीत ६०चा भाव आहे.