23 September 2020

News Flash

आठवडय़ाची मुलाखत : मानवी हस्तक्षेपामुळे वनजीवन धोक्यात

मुंबई-ठाण्यालगत असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा नैसर्गिक संपत्तीचा फार मोठा ठेवा आहे.

रोहित जोशी - संयोजक, नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल वॉच संस्था

रोहित जोशी – संयोजक, नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल वॉच संस्था
मुंबई-ठाण्यालगत असलेले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा नैसर्गिक संपत्तीचा फार मोठा ठेवा आहे. मात्र वाढत्या शहरीकरणाने गेली काही वर्षे या जंगलसंपत्तीवर कळत-नकळतपणे आक्रमण होऊ लागले आहे. पर्यावरणप्रेमी नागरिक आणि संस्था सातत्याने याबाबतीत सतर्कतेचा इशारा देत आले आहेत. यंदा ठाणे महापालिकेच्या पर्यावरणविषयक अहवालातही उद्यानाचा एक भाग असलेले येऊरचे जंगल धोक्यात आल्याची कबुली देण्यात आली आहे. येऊरमध्ये अनेक पर्यावरणस्नेही संस्था जंगल संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. त्यापैकी एक असलेल्या ‘नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल वॉच’ या संस्थेचे संयोजक रोहित जोशी यांच्याशी साधलेला संवाद..

येऊर वन परिसराची सद्य:स्थिती काय आहे?
येऊरच्या जंगलातील झाडे, वनस्पती, औषधी वनस्पती यांची संख्या पाहता येऊरचे जंगल निरनिराळ्या झाडांनी परिपूर्ण आहे असे म्हणता येईल. मात्र ही जंगलाची उत्तम परिस्थिती कायम टिकून राहणे महत्त्वाचे आहे. ठाणे जिल्ह्य़ातील एकूण भूभागांपैकी चाळीस टक्के जमिनीचा भाग हा वनांसाठी आहे. येऊर त्यापैकी एक. मात्र या एकूण वनजमिनींपैकी किती वनजमिनी संरक्षित आहेत, असा प्रश्न पडतो. कारण चाळीस टक्के वनजमिनीची नोंद केवळ कागदावर आहे. प्रत्यक्षात या वनजमिनी किती प्रमाणात उपलब्ध आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. एकूणच या वनांच्या देखरेखीत विस्कळीतपणा आलेला दिसतो. मानवी हस्तक्षेपामुळे येऊरचे जंगल नाहीसे होण्याची भीती आहे. एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीने ते धोकादायक आहे. भविष्यात उद्भविणाऱ्या नैसर्गिक आपत्तीपासून रक्षण करायचे असल्यास जंगलांची योग्य देखभाल होणे गरजेचे आहे. घोडबंदर परिसरातील जंगलाच्या खालचा परिसर पाहिला, तर त्या ठिकाणी बांधलेल्या बहुतेक इमारती अनधिकृत आहेत. या जंगलामध्ये होणारा मानवी हस्तक्षेप वाढत गेला तर भविष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
कोणकोणते पक्षी येऊरच्या जंगलात येतात?
साधारण सर्वच वन परिसरात वेगवेगळ्या पक्ष्यांचे वास्तव्य असते. येऊरच्या जंगलात नोव्हेंबर ते जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत वेगवेगळे स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात. थंड प्रदेशातून येणाऱ्या या स्थलांतरित पक्ष्यांना घनदाट जंगलाची आवश्यकता असते. हिमालयात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे घनदाट जंगलाच्या शोधात हे पक्षी येऊरच्या जंगलात या काळात वास्तव्यास येतात. त्यातील बरेचसे पक्षी जंगली पक्षी म्हणून ओळखले जातात. येऊरचे घनदाट जंगल या पक्ष्यांना पोषक ठरते. यात इंडियन वर्डिटर फ्लायकॅचर, अल्ट्रामरीन फ्लायकॅचर, रेड ब्रिस्टेड फ्लायकॅचर, ब्लू कॅप्ड रॉक थ्रश, फॉरेस्ट व्ॉगटेल, ओरिएंटल द्वारक किंगफिशर अशा वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी या काळात येऊरच्या जंगलात पाहायला मिळतात. मात्र अनेकदा येऊर गावातील लहान मुलांना या पक्ष्यांच्या रक्षणाबद्दल जाणीव नसल्याने बेचकीने या पक्ष्यांना मारण्याचे प्रकार घडतात. या वर्तनाला आळा बसणे गरजेचे आहे. यासाठी विविध पर्यावरण संस्था एकत्र येऊन या विषयाच्या संदर्भात जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेत आहेत. २५ ते ३० प्रकारच्या वेगवेगळ्या जातींचे सस्तन प्राणी येऊरच्या जंगलात आहेत. येऊर जंगलात वाढत जाणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे तेथील प्राणी, पक्ष्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे. पर्यावरणाच्या संवर्धनाविषयी जागरूकता ठेवून मानवी वर्तन झाल्यास या परिस्थितीला आळा बसू शकतो.
वाढत्या अतिक्रमणाचा फटका कोणत्या प्राणी-पक्ष्यांना बसतोय?
जंगल परिसर संपूर्णत: प्राणी आणि पक्ष्यांसाठी आहे हे वास्तव आपण स्वीकारायला हवे. गेल्या काही वर्षांतील वाढत्या अतिक्रमणाचा त्रास सर्वच प्राण्यांवर होताना दिसतो. येऊरच्या जंगलात या अतिक्रमणाचा त्रास माकड आणि बिबटय़ांना जास्त प्रमाणात होतो. माकडांना जंगलात सहज उपलब्ध होणारे जांभूळ, बोराची झाडे पूर्वीसारखी येऊरच्या जंगलात आता मुबलक प्रमाणात उपलब्ध राहिलेली नाहीत. बिबटय़ांचे वास्तव्य असणाऱ्या जंगलात मानवी हस्तक्षेप होऊ लागल्यानंतर बिबटय़ांनी मानवी वस्तीत प्रवेश केला हे विसरता कामा नये. एखादा भुयारी मार्ग तयार करताना जंगल परिसरातून हा रस्ता गेल्यास साहजिकच तेथील सर्वच प्राण्यांना त्रास होतो. मानवासारखे पक्षी, प्राणी स्थलांतर करू शकत नाहीत. गायमुख ते बोरिवली हा भुयारी मार्ग तयार करताना अर्थातच त्या ठिकाणची झाडे कापली जातील. केवळ जमिनीवरच नाही तर जमिनीखालीही प्राण्यांचे वास्तव्य असते. त्यामुळे या प्राण्यांच्या जीविताला धोका निर्माण होतो. मानपाडा, येऊर या ठिकाणी ओल्या पाटर्य़ा होतात. दारूच्याबाटल्या, पिशव्या या जंगल परिसरात जमा होतात. पक्षी, प्राण्यांनी अन्न शोधून खाताना या पिशव्या त्यांच्या पोटात जाऊन प्राण्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांना येऊरमध्ये मज्जाव करायला हवा. याशिवाय निसर्गाचा मोठय़ा प्रमाणात ऱ्हास होतो. पावसाळ्यात भेंडीनाल्यात प्लास्टिकच्या पिशव्यांचे ढीग जमा होतात. जोपर्यंत या सर्व बाबतीत कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत सर्वच स्तरांवर होणाऱ्या वाढत्या अतिक्रमणाचा त्रास प्राण्यांना होईल.
वन विभाग आणि पर्यावरण संस्था यांच्यामधील समन्वय कसा आहे?
वन परिसरातील समस्या सोडवण्यासाठी वन विभाग आणि पर्यावरण संस्था यांनी एकत्रित काम करणे गरजेचे आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काही उपक्रम हाती घेतले आहेत. काही प्रमाणात अधिक समन्वयाची गरज आहे. वन विभाग आणि पर्यावरण संस्था यांच्यातील सकारात्मक समन्वयक असेल, तर अधिक चांगल्या पद्धतीने वन संवर्धन होऊ शकेल. माकडांसाठी येऊरच्या जंगलात फळझाडे कमी आहेत. त्यामुळे मुबलक प्रमाणात प्राण्यांना फळे उपलब्ध व्हावी या उद्देशाने वन विभाग आणि नॅशनल एन्व्हायर्न्मेंटल वॉचअंतर्गत येऊर पर्यावरण सोसायटी यांनी एकत्रितपणे वृक्ष लागवड केली होती. यात सुमारे १०० फळझाडांची लागवड येऊरच्या जंगलात करण्यात आली. सहा महिने सातत्याने एकत्रितपणे जंगलातील कचरा साफ केला. यंदाच्या वर्षी जंगल परिसरातील नूतन वर्षांच्या पाटर्य़ावर अंकुश ठेवण्यासाठी वनविभागाला आवाहन केले होते. त्यानुसार या वर्षी दरवर्षीपेक्षा पाटर्य़ाचे प्रमाण कमी दिसून आले. त्यामुळे वन विभाग आणि येऊर पर्यावरण सोसायटी यांच्या समन्वयाने हा उपक्रमही यशस्वी झाला होता.
जनजागृतीसाठी पर्यावरण संस्थांकडून काय उपक्रम राबवले जातात?
येऊरचे जंगल लोकांना केवळ सहलीचे ठिकाण म्हणून माहीत आहे. मात्र जैवविविधतेसाठी येऊरचे जंगल अतिशय उत्तम आहे. मात्र जंगलांच्या या वैशिष्टय़ाची नागरिकांना फारशी माहिती नसते. येऊर पर्यावरण सोसायटीतर्फे नागरिकांसाठी पर्यावरण सहल आयोजित करण्यात येते ज्यामध्ये विविध प्राणी, पक्षी, वनस्पती यांची ओळख सहलीमध्ये करून देण्यात येते. यामुळे निसर्ग आणि नागरिक यांच्यामध्ये समन्वय साधण्यास मदत होते. येऊरमधील स्थानिक आदिवासी मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यातून त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळू शकेल. या स्पर्धेत चांगली चित्रे काढणाऱ्या मुलांना एलिमेंटरी परीक्षेसाठी बसवण्यात येणार आहे. गावात शिक्षण घेणाऱ्या लहान मुलांचे अनेकदा शिक्षण अपूर्ण राहते. शिक्षण अपूर्ण राहिल्याने किंवा रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने मुले बेकायदा दारूविक्री, शिकारी करतात. त्यामुळे या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा भावी उपक्रम आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 12, 2016 6:37 am

Web Title: wildlife in danger due to human intervention say rohit joshi
टॅग Wildlife
Next Stories
1 तपासचक्र : मोबाइल ‘लोकेशन’मुळे पितळ उघडे!
2 ठाण्यात राष्ट्रवादीत फूट ? सूरज परमार प्रकरणामुळे नगरसेवकांची गुप्त बैठक
3 भिवंडीतील गोदामांच्या खरेदी-विक्रीला बंदी
Just Now!
X