चैत्रशुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याचे स्वागत आता ठिकठिकाणी स्वागत यात्रेने केले जाते. अगदी सातासमुद्रापार स्वागत यात्रांचे लोण पोचले आहे. डोंबिवलीतील स्वागत यात्रेचा मात्र काही औरच नजराणा असतो. कारण स्वागत यात्रांचा पायंडाच मुळी डोंबिवलीकरांनी घालून दिला आहे. दरवर्षी नवे उपक्रम येथील स्वागत यात्रेत राबविले जातात. यंदाच्या स्वागत यात्रेचे नेतृत्व महिला करणार आहेत. त्यामुळे डोंबिवलीकर महिला स्वागत यात्रेच्या तयारीसाठी पदर खोचून सज्ज झाल्या आहेत.  
श्रीगणेश मंदिर संस्थान व नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीच्या वतीने गेली १५ वर्षे नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. परंपरा आणि आधुनिकता याचा सुरेख संगम यात्रेत पाहायला मिळतो. त्याचबरोबरीने सामाजिक बांधीलकी जपण्याचा संदेशही यात्रेच्या माध्यमातून दिला जातो. डोंबिवलीकरांनी सुरू केलेल्या या उपक्रमाचे आता जगभरातील मराठीजनांनी अनुकरण केले आहे. डोंबिवलीतील शंभर एक संस्थांसोबतच हजारो नागरिक या यात्रेत दरवर्षी सहभागी होतात. तरीही शहराच्या कानाकोपऱ्यात अत्यंत शिस्तीत ढोल-ताशांच्या गजरात ही यात्रा पार पडते. या यात्रेचे नियोजन करणे आणि ते पार पाडणे ही खरे तर कसोटीच आहे. मात्र स्वागत यात्रा संयोजन समिती ती लीलया पार पाडते. यंदा या समितीने यात्रा संयोजनाची धुरा महिलांवर सोपविली आहे. शहरातील २० महिला व पाच पुरुष यात्रेचे नियोजन करणार आहेत.  
गेल्या वर्षी कल्याण येथील सुभेदार वाडा गणेशोत्सवाचे आयोजन महिलांनी केले होते. त्याच धर्तीवर वेगळे काही तरी करावे असे सुचले आणि महिलांवर यंदाच्या स्वागत यात्रेची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला. स्वागत यात्रेत आतापर्यंत, नेत्रदान, देहदान, दुष्काळग्रस्त भागात पाण्याची कायमस्वरूपी सोय करण्यासाठी बंधारे बांधणे आदी संकल्प पूर्णत्वास नेण्यात समितीला यश आले आहे. यंदा स्वच्छता अभियानाची संकल्पना समोर येत असून त्याबरोबरच महिला संरक्षण, नवदुर्गा स्त्री शक्तीचे रूप दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शर्मिला वाळुंज, डोंबिवली

रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाचा अडथळा
यंदा महिलांच्या या कमिटीसमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते स्वागत यात्रा मार्गाचे. फडके पथ व गणेश पथवर रस्त्यांचे सिमेंट क्राँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने गुढीपाडव्यापर्यंत हे काम पूर्ण होईल की नाही याविषयी शंका आहे. यामुळे गणेश मंदिर येथे होणारी भाविकांची गर्दी तसेच फडके रोडवर लोटणारी तरुणाईची गर्दी यातून स्वागत यात्रेत सामील होणारे रथ मार्गस्थ होणे कठीण आहे. यामुळे स्वागत यात्रेचा मार्ग बदलण्याचा विचार समिती करत आहे.  

गुढीपाडव्याला डोंबिवलीतून निघणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत महिलांची संख्या नेहमीच लक्षणीय असते. मात्र, यंदा पहिल्यांदाच या स्वागत यात्रांचे नियोजनच महिलांच्या हाती सोपवण्यात येत आहे. डोंबिवलीने ठेवलेला हा आदर्श इतर ठिकाणच्या स्वागत यात्राही घेतील, अशी आशा आहे.
प्रवीण दुधे, नववर्ष स्वागत यात्रा संयोजन समितीचे उपाध्यक्ष

मराठमोळ्या पद्धतीने दरवर्षी ही स्वागत यात्रा निघते. नागरिक पारंपरिक वेशभूषा करून यात सहभागी होतात. मात्र वेगवेगळ्या प्रांतांचे नागरिकही येथे मोठय़ा संख्येने राहात असून त्यांनीही त्यांच्या पारंपरिक वेशभूषेत या यात्रेत सामील होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
– दीपाली काळे, स्वागत यात्रा संयोजन समितीच्या संयोजिका