लहानपणापासूनच झाडांच्या ‘जगण्याकडे’ यंदे यांचं लक्ष होतं. बेडेकर कॉलेजमध्ये असताना हरियालीच्या वृक्षारोपणाच्या उपक्रमांत त्यांचा कार्यकर्ता म्हणून सहभाग असे. ‘नेचर क्लब’ या कॉलेजच्या चळवळीत ते सक्रिय होते. त्यांनी लावलेल्या कडुनिंबाच्या रोपांचे आज डेरेदार वृक्ष झाले असून वाऱ्याला खेळवत आहेत. वटपौर्णिमेला पूजेसाठी तोडलेल्या फांद्या बघून त्यांना खूप वाईट वाटे. एका वटपौर्णिमेला त्यांनी आईला फांदी आणून दिली नाही. त्यांच्या सोसायटीतील भिंतीच्या फटीतून उगवलेल्या रोपावर त्यांचा डोळा होता. कुणी तरी ते उपटून, फेकून देणार, त्यापेक्षा मी त्याला जगवलं, वाढवलं तर.. त्यांनी ते अलगद हाताने काढून घेऊन जमिनीत लावले आणि आईला त्याची पूजा करण्यास सांगितले. त्याच क्षणापासून हा ‘हिरवा वसा’ निभावण्याचा ‘विक्रम’ त्यांनी चालू केला.
‘समान शीले व्यसनेषु सख्यम्’ या नियमाने योगेश क्षत्रियलाही ही कल्पना आवडली. दोघांना एकच छंद लागला. इमारतीच्या भेगांमध्ये, प्लम्बिंगच्या पाइपमध्ये कोपऱ्यात कुठे तरी पक्ष्यांच्या विष्ठेतून वड, पिंपळ, उंबर अशी रोपं उगवत असतात. सोसायटीतल्या सभासदांची परवानगी घेऊन ती सोटमुळाला धक्का न लावता मुळासकट उपटून आणायची. रुटेक्स पावडरीच्या मिश्रणात बुडवून ठेवायची. पाने काढून टाकायची. रोपं तयार करायची आणि मग महानगरपालिकेच्या बागांमध्ये, रस्त्यावर किंवा ज्यांना घराच्या परिसरात गावाकडे लावायची असतील, त्यांना तिथे लावून द्यायची. आणखीही पाच-सहा जण आपणहून सहभागी झाले आणि ‘ग्रीन अंब्रेला ऑर्गनायझेशन’ तयार झाली.
सूर्याच्या उष्णतेने प्रकाश संश्लेषण होऊन प्राणवायू वडाच्या पानाच्या खालच्या बाजूने जास्त प्रमाणात बाहेर सोडला जातो. हाच प्राणवायू सत्यवानाच्या बाबतीत नैसर्गिक व्हेंटिलेटर ठरला आणि त्याचा जीव वाचला. त्यामुळे कुठलाही व्यावसायिक हेतू न ठेवता वड, पिंपळ, उंबर अशी स्थानिक झाडे वाचविण्याच्या प्रयत्नांबरोबर दुर्मीळ झाडांच्या बिया येऊर, कर्नाळा अभयारण्य, राणीचा बाग अशा ठिकाणी जाऊन गोळा करून त्यांची रोपं ही सगळे जण तयार करू लागले. दुर्मीळ वायवर्ण, ज्ञानेश्वरांचा अजाण वृक्ष (जो कोपरी व मेंटल हॉस्पिटलजवळ आहे) भोकर, शिवण, असाणा, सोनसावर, कलम, अंबाडी, शेमट, कुसुम, पालसा, काकड हे त्यापैकी काही.
सुरुवातीला स्वत:च्या घराच्या बाजूला अंगणात, गच्चीत ही हिरवी बाळे राहू लागली. संख्या वाढू लागल्यावर कळवा गार्डनमध्ये एका कोपऱ्यात विक्रम यंदे यांनी स्वखर्चाने ग्रीन नेट लावले आणि बाळे तिथे वाढू लागली. माळ्याला रोज पाणी पाजायला सांगितले गेले. कल्याण जनता सहकारी बँक, ठाणे भारत सहकारी बँक यांचा टिटवाळ्याचा प्रकल्प, संजय गांधी उद्यान, वनखाते यांच्या इच्छेला मान देत ‘रोपं’ तिकडे जाऊ लागली. विक्रम यंदे यांनी नक्षत्रवनाची संकल्पना कळवा गार्डनमध्ये आणि इतरही ४/५ फार्म हाऊसेसवर मेहनत घेऊन राबवली. पर्यावरण समृद्धी हा एकमेव उद्देश. काही निसर्गप्रेमी उत्साही तरुणांनी विक्रम यंदे यांच्याकडून प्रेरणा घेऊन विरार, वसई अशा आपल्या विभागात हे पुनरुज्जीवनाचे काम सुरू केले. साधारण वर्षांला ४०० रोपे तयार होऊ लागली.
..आणि अचानक काही दिवसांपूर्वी कळवा गार्डनमधील रोपांवर बांधकामाच्या निमित्ताने संक्रांत आली. ५०० रोपांपैकी तीनशेच्या वर रोपे जमीनदोस्त झाली. उरलेली रोपे बेघर झाली. विक्रम यंदे खचून गेले. जागा देऊ असे आश्वासन अजून तरी प्रत्यक्षात आलेले नाही, याचे विक्रम यंदे यांना फार वाईट वाटत आहे. दुर्मीळ झाडांची रोपं संग्रहित करण्यासाठी कोणी जागा दिली तर विक्रम यंदे यांना ती हवी आहे. तसे नाही झाले तर हा हिरवा संसार उजाड होऊन जाईल, म्हणून हा लेखनप्रपंच.