ऐश्वर्या अग्रवाल हत्या प्रकरणात तरुणाईची मागणी

ऐश्वर्या अग्रवाल या तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी तसेच या प्रकरणात चालढकल करणाऱ्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यासाठी विरारमध्ये बुधवारी तरुणाईने धडक दिली. मुंबई आणि परिसरातील शेकडो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते.

विरारमध्ये राहणाऱ्या ऐश्वर्या अग्रवाल या १९ वर्षीय तरुणीची गेल्या आठवडय़ात तिच्या प्रियकराने आणि त्याच्या मित्राने मिळून हत्या केली होती. प्रियकरा सोहेल शेख याने ऐश्वर्याला त्याचा मित्र दीपक वाघ्री याच्या घरी भेटायला बोलावले. तेथे दीपकेने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करताच दीपकने कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी हत्येनंतर आरोपी सोहेल शेख याला ताब्यात घेऊन मध्यरात्री दोनच्या सुमारास गपचूप सोडून दिले. यामुळे एकच संताप उसळला. एवढी मोठी घटना घडून पोलिसांनी आरोपीला सोडल्याबद्दल पोलिसांविरोधा तीव्र असंतोष उफाळून आला आहे. शनिवारी संतप्त नागरिकांनी विरार पोलीस ठाण्यात मोर्चा काढून पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना निलंबित करण्याची मागणी केली होती.

या घटनेची तुलना दिल्लीच्या निर्भया हत्याकांडाशी करण्यात आली आहे. त्यामुळे बुधवारी मोठय़ा संख्यने तरुणाई विरारमध्ये जमली. त्यांनी विवा महाविद्यालयाजवळून मोर्चा काढत तो पोलीस ठाण्यावर नेला. स्थानिक नगरसेविका रिटा सरवैया यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. त्या वेळी अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या मोच्र्याबाबत सोशल मीडियावरून माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात होते.

शेकडो विद्यार्थ्यांचा सहभाग

पोलिसांनी आरोपी सोहेलला त्या दिवशी का सोडले, त्याचा प्रत्यक्ष सहभाग दिसत असताना गुन्हा का दाखल केला नव्हता, असा सवाल नगरसेविका रिटा सरवैया यांनी केला. पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. या मोच्र्यासाठी मुंबई अणि परिसरातून शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते.

आम्ही या प्रकरणात सोहेल शेख आणि दीपक वाघ्री या दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर हत्या, बलात्काराचा प्रयत्न आदी गंभीर गुन्ह्य़ांची कलमे लावली आहेत. कुणालाही या प्रकरणात वाचविले जाणार नाही. चौकशीत जे दोषी असतील त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल.

– योगेश कुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, वसई