कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या तीन प्रभागांमधील १६ कर्मचाऱ्यांना आयुक्तांच्या आदेशावरून आज तडकाफडकी निलंबित करण्यात आले. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाले हटविण्याची, प्रभागांमधील अनधिकृत बांधकामे तोडण्याची मोहीम जोरदार सुरू आहे; परंतु संबंधित कर्मचारी कामात हलगर्जीपणा करीत असल्याचे, तसेच काही कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या. त्यामुळे ‘अ’, ‘ह’ आणि ‘क’ प्रभागांमधील १६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक ते फुले चौक रस्त्यावरील अतिक्रमणे काढून रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी फेरीवाले बसू नयेत म्हणून काळजी घेण्याऐवजी क प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील कर्मचारी या फेरीवाल्यांची पाठराखण करीत असल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे आल्या होत्या.

तसेच हे कर्मचारी सतत गैरहजर राहणे, कार्यालयात वेळेवर येत नव्हते. अ, ह प्रभागांतील तीन कर्मचारी फेरीवाले हटविणे, फलक काढणे, अनधिकृत बांधकाम मोहिमेत सहभागी न होणे असे प्रकार करीत होते. स्मार्ट सिटीअंतर्गत शहर सुधारणेचे कार्यक्रम प्रशासनाने हाती घेतले आहेत. या उपक्रमांना हे कर्मचारी अडथळा आणीत असल्याचे स्पष्ट झाल्याने आयुक्त ई. रवींद्रन यांच्या आदेशावरून या कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले.