ठाणे महापालिकेतील २१ दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याचा निर्णय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी गुरुवारी घेतला आहे. हे कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक दिवस सतत गैरहजर राहत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे आयुक्त जयस्वाल यांनी ही कारवाई केली आहे.
ठाणे महापालिकेच्या सेवेतील ३५ कर्मचारी पाच वर्षांपेक्षा अधिक दिवस गैरहजर असल्याची बाब महापालिका प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना १५ दिवसांच्या आत खुलासा करण्यास सांगितले. ३५ पैकी १४ कर्मचाऱ्यांनी कामावर गैरहजर रहाण्याबाबत स्पष्टीकरण दिले होते. मात्र, उर्वरित २१ कर्मचाऱ्यांनी महापालिकेला स्पष्टीकरण दिले नव्हते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत स्वारस्य नाही, असे गृहीत धरून काढून टाकण्यात येईल, असे आवाहनही महापालिकेने केले होते. मात्र, या आवाहनालाही त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही, म्हणून आयुक्त जयस्वाल यांनी त्यांना सेवेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.