पालिकेच्या ताफ्यातील २५ नव्या बस २४ ऑक्टोबरपासून चालवणार
राज्य परिवहन महामंडळ आणि बेस्ट प्रशासनाकडून अद्याप कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तातडीने नव्या बसेसपैकी पंचवीस बसेस स्वत: चालविण्याचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिके ने घेतला आहे. येत्या २४ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नव्या बसेसचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिका स्वत:च कंत्राटी पद्धतीने चालक व वाहक घेऊन बस चालविणार असल्याचे आयुक्त अच्युत हांगे यांनी शुक्रवारी पार पडलेल्या पालिकेच्या महासभेत सांगितले.
महापालिकेची परिवहन सेवा चालविणारा सध्याचा कंत्राटदार दर्जेदार सेवा देण्यात सपशेल अपयशी ठरला असल्याने महापालिकेने राज्य परिवहन महामंडळ व बेस्ट प्रशासनाकडे सेवा देण्याची विनंती केली होती. सध्या महापालिकेची परिवहन सेवा केस्ट्रेल इन्फ्रास्ट्रक्चर हा कंत्राटदार चालवत आहे. परंतु योग्यप्रकारे सेवा देत नसल्याने प्रवाशांची मोठी गरसोय होत आहे. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरोत्थान महाअभियानातून महापालिकेला नव्वद बस मंजूर झाल्या आहेत. परंतु सध्याच्या कंत्राटदाराच्या हाती या बस दिल्या तर नव्या बसेसचीही अवस्था बिकट होईल, अशी भीती वाटत आहे. त्यासाठी नवा कंत्राटदार व नवे मॉडेल राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यास अजून तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत प्रवाशांची गरसोय दूर करण्यासाठी महापालिकेने राज्य परिवहन सेवा व बेस्ट प्रशासनाला शहरातील मार्गावर त्यांची सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रतिसादाची सुतराम शक्यता नसल्याने महापालिकेने स्वत:च बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या पंचाहत्तर दशलक्ष लिटर पाणी योजनेच्या भूमिपूजन समारंभ २४ ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापालिकेला मंजूर झालेल्या काही बसचेही उद्घाटन यावेळी करून घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे वीस ते पंचवीस बस तातडीने रस्त्यावर उतरविण्यात येणार आहेत. मात्र त्या सध्याच्या कंत्राटदारामार्फत न चालवता बसचालक व वाहन ठेका पद्धतीने घेऊन महापालिका स्वत:च चालविणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.