scorecardresearch

कल्याण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही २५ आदिवासी पाडे रस्ते, विजेपासून वंचित

शहापूर श्रमजीवी संघटनेचा आंदोलनाचा इशारा

कल्याण : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातही २५ आदिवासी पाडे रस्ते, विजेपासून वंचित
( शाळेत जाणारी आदिवासी वस्तीवरील मुले. )

भगवान मंडलिक
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात जल्लोषात साजरा होत असताना, ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील २५ आदिवासी पाडे, वस्त्या वीज पुरवठा, रस्ते, पाण्यापासून वंचित आहेत. या वस्त्यांकडे शासन, लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष डोंगर दऱ्यातील दगड, मातीच्या कच्च्या रस्त्यावरुन येजा करणे हेच या येथील आदिवासींच्या नशिबी आहे, अशी माहिती श्रमजीवी संघटनेचे सचिव शहापूर तालुका प्रमुख प्रकाश खोडका यांनी दिली.

शहापूर तालुक्यात सर्वाधिक आदिवासी वस्ती आहे. शासनाच्या अनेक योजना आदिवासी विकासासाठी असल्या तरी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा या योजना प्रभावीपणे आदिवासी भागात राबवित नसल्याने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात आदिवासी पाड्यांवर रस्ते नाहीत. वीज आली नाही, अशी माहिती सचिव खोडका यांनी दिली.

वाडीवरील बहुतांशी आदिवासी कष्टकरी, मजूर आहेत. उपजीविके पुरती शेती करुन मजुरीसाठी तो आजुबाजुची गावे, तालुक्याच्या ठिकाणी जातो. रोज कमवून त्यातून मिळणाऱ्या पैशातून उपजीविका करायची हे या भागातील आदिवासींचे दैनंदिन जीवन आहे. आदिवासी पाड्यांवर शाळा नसल्याने मुलांना परिसरातील शाळांमध्ये जावे लागते. वाडीपासून ते शाळेत जाण्यासाठी मुलांना कच्चा, डोंगर उताराचा रस्ता, पावसाळयात दुथडी वाहत असलेले ओहोळ, शेताचे पऱ्हे पार करुन जावे लागते, असे सचिव खोडका यांनी सांगितले.

रात्रीच्या वेळेत या रस्त्यांवरुन येजा करताना सरपटणारे, जंगली प्राण्यांची भीती असते. रात्रीच्या वेळेत वाडीत कोणी आजारी पडला तर त्याला डोली करुन गाव परिसरातील आरोग्य केंद्र ठिकाणी न्यावे लागते. असे खोडका यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनाने नागरी सुविधांपासून वंचित आदिवासी वाड्यांमध्ये सुविधा द्याव्यात, अशी मागणी खोडका यांनी केली.सुविधांपासून वंचित आदिवासी पाड्यांच्या नियंत्रक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना या वाड्यांमध्ये सुविधा देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्थसंकल्प तरतुदीमधून ही कामे केली जातील, अशी माहिती शहापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांनी सचिव खोडका यांना दिली.

वंचित आदिवासी वाड्या

साकडबाव-तळ्याची वाडी, अघई-ठाकुरवाडी, बोरशेती-लोभी, पोढ्याचा पाडा, वेहलोंडे-सापटेपाडा, अस्नोली-तईचीवाडी, कोठारे-वेटा, फुगाळे-वरसवाडी, अजनूप-दापूरमाळ, शिरोळ-सावरकुट, उंभ्रई-कातकरीवाडी, वसरस्कोळ-कातकरी वाडी, मोहिली-माळीपाडा, मोखावण-राड्याचापाडा, टेंभा-आंबिवली,डोंळखांब जवळील गुंडे हद्दीतील भितारवाडी, चाफेवाडी, कोठेवाडी, वांद्रे-दोडकेपाडा, अलनपाडा, आदिवली-पाथरवाडी, पिवळी-नळाचीवाडी, साकुर्लीवाडी.

शहापूर तालुक्यात सर्वाधिक आदिवासी वस्ती आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात या गावांमध्ये शासनाने रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शाळा सुविधा दिल्या नाहीत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशभरात उत्साहात साजरा होत असताना महाराष्ट्र शासनाने या सुविधा वंचित आदिवासी पाड्यांकडे लक्ष द्यावे.- प्रकाश खोडका,सचिव, श्रमजीवी संघटना ,शहापूर तालुका

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.