कल्याण-डोंबिवली पालिकेतील शिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य ठेवण्यासाठी सेनेच्या दबावाला झुकून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही गावे पुन्हा कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या झोळीत टाकल्याने भाजपमधील स्थानिक नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.
या भागातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार रमेश पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी विधानसभा निवडणुकीत त्यांची या गावांमधील पकड ढिली झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले होते. शिवसेनेचे सुभाष भोईर हे या भागातील विद्यमान आमदार असल्याने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर येथे शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगण्याची चिन्हे अधिक दिसू लागली आहेत.
शासनाने २७ गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाचे राजकीय पडसाद स्थानिक पातळीवर उमटतील, असे स्पष्ट चित्र आहे. गावे समाविष्ट केल्यामुळे या भागातून सुमारे १० ते १५ नगरसेवक महापालिकेत निवडून जातील. या सगळ्या पट्टय़ात पूर्वीपासून शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. मात्र, राज ठाकरे यांच्या करिश्म्याच्या जोरावर येथून मनसेचे रमेश पाटील काही वर्षांपूर्वी निवडून गेले.
आमदार असूनही पाटील यांना येथील शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का पोहचविता आला नव्हता. गेल्या निवडणुकीत तर मुंब््रयाचे रहिवासी असलेले सुभाष भोईर यांनी पाटील यांना त्यांच्या घरातच धक्का दिला. यावेळी २७ गाव परिसरातून सुभाष भोईर यांनी मोठे मताधिक्य घेतले. निवडणुकीनंतर रमेश पाटील यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपमध्ये युती झाली नाही तर या ठिकाणी हे दोन्ही पक्ष आमने-सामने उभे ठाकतील, असे स्पष्ट चित्र दिसत आहे.
या गावांचा महापालिकेत समावेश करावा यासाठी पालकमंत्री एकनाथ िशदे कमालीचे आग्रही होते. ग्रामीण पट्टय़ात सेनेचा आमदार आहे. या भागातील मनसेचे माजी आमदार रमेश पाटील भाजपमध्ये सहभागी झाले असले तरी भाजपचा या भागातील प्रभाव नाममात्र आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीचा काही भागात वरचष्मा असला तरी तो प्रबळ नाही. आजदे ग्रामपंचायतीचा पालिकेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पालिकेच्या पटलावर घेण्यात आला आहे.