scorecardresearch

नौपाडय़ात ५३ इमारतींना धोका

धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून शहरात घडत आहेत.

dangorous building in thane
धोकादायक इमारतीं

पावसाळय़ापूर्वी ३६९३ धोकादायक इमारतींची यादी जाहीर;

मध्यवर्ती ठाण्यात सर्वाधिक धोकादायक इमारती

गेल्या अनेक वर्षांपासून अतिधोकादायक तसेच धोकादायक इमारतींच्या आकडेवारीमध्ये आघाडीवर असलेल्या कळवा, मुंब्रा तसेच वागळे परिसराला यंदा शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या नौपाडा विभागाने मागे टाकल्याची बाब पुढे आली आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात ६९ अतिधोकादायक तर ९१ धोकादायक इमारती असल्याची यादी प्रशासनाने जाहीर केली असून त्यापैकी एकटय़ा नौपाडा विभागात ३२ अतिधोकादायक तर २१ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. या भागातील जुन्या इमारतींचा पुनर्विकास रखडल्याने धोकादायक इमारतींच्या संख्येत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

मान्सून काळात धोकादायक इमारती कोसळून त्यामध्ये जीवितहानी होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांपासून शहरात घडत आहेत. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून दर वर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. तसेच या इमारती रिकाम्या करून त्या पाडण्याची कारवाई करण्यात येते. यंदाही प्रशासनाने अशा प्रकारची यादी जाहीर केली असून त्यामध्ये ३ हजार ६९३ धोकादायक इमारती असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या इमारतींचे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या गटात अतिधोकादायक तर उर्वरित तीन गटात धोकादायक इमारतींचा समावेश आहे. अतिधोकादायक इमारतींच्या यादीमध्ये ६९ इमारतींचा समावेश आहे तर धोकादायक इमारतींच्या पहिल्या गटाच्या यादीत ९१ इमारतींचा समावेश आहे. पावसाळ्यामध्ये या इमारती कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनाने या इमारती रिकाम्या करण्याची कारवाई सुरू केली आहे. तसेच अतिधोकादायक इमारत पाडण्याची कारवाई सुरू केली आहे. उर्वरित धोकादायक इमारतींच्या दोन गटांमध्ये एकूण ३ हजार ५३३ इमारतींचा समावेश असून या इमारतींची महापालिका अधिकारी तपासणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. वागळे, कळवा तसेच मुंब्रा भागात मोठय़ा प्रमाणात बेकायदा इमारती असून त्यापैकी अनेक इमारती धोकादायक झाल्याचे महापालिकेच्या पाहणीतून यापूर्वीच समोर आले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महापालिकेकडून पावसाळ्यापूर्वी जाहीर करण्यात येणाऱ्या धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये हे तीन विभाग आघाडीवर असायचे. मात्र, यंदाच्या यादीमध्ये नौपाडा विभाग आघाडीवर असल्याचे समोर आले आहे.

 

इमारतींची आकडेवारी

प्रभाग                     अतिधोका.   धोकादायक

कळवा                          २                  ५

रायलादेवी                   ३                  ६

कोपरी                        ७                  ४

मुंब्रा                          ९                   १४

दिवा                         १                   ७

उथळसर                  ७                  ८

लोकमान्य नगर      ०                 ३

वर्तकनगर               ४                 ८

माजिवाडा                ४                १५

वागळे                      ०                ०

नौपाडा                     ३२             २१

एकूण                       ६९             ९१

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2017 at 04:37 IST