४ महिन्यांत वसईत ४६ प्रवाशांचा मृत्यू; रेल्वेच्या विविध उपाययोजनांवरही पाणी

वसई रेल्वे स्थानकातून मालगाडीवर चढून रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्यानंतर रूळ ओलांडण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रवाशांनी रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वे प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या, प्रवाशांना वारंवार आवाहनही केले, मात्र तरीही प्रवाशांची रूळ ओलांडण्याची सवय कायम असल्याचे दिसून आले आहे. गेल्या चार महिन्यांत तब्बल ४६ प्रवाशांचा मृत्यू रूळ ओलांडताना झाला आहे.

वसई, नालासोपारा आणि विरार ही अत्यंत गर्दीची स्थानके आहेत. दररोज हजारो प्रवासी येथून प्रवास करत असतात. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वे आणि सामाजिक संस्थेतर्फे वारंवार आवाहन केले जाते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. जानेवारी २०१७ ते एप्रिल २०१७ या महिन्यात वसई, नालासोपारा, विरार आणि नायगाव स्थानकांतून रेल्वे रूळ ओलांडताना तब्बल ४६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. प्रवाशांनी रेल्वे रूळ ओलांडू नये यासाठी रेल्वेने पादचारी पूल आणि भूयारी मार्ग बनविले आहेत. त्यांची संख्यादेखील वाढवली आहे, मात्र तरीही रेल्वे प्रवासी रूळ ओलांडत असतात, हे दुर्देवी असल्याचे वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी सांगितले. रेल्वे तसेच आम्ही अनेकादा मोहिमा आखून प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्यापासून परावृत्त करत असतो, असे ते म्हणाले.

विरारला राहणाऱ्या वडिलांना भेटायला आलेला ऑस्टिन अँथोनी या मुलाचा बुधवारी रूळ ओलांडताना मृत्यू झाला. सामान नेण्यासाठी पादचारी पुलाचा वापर न करता ऑस्टिनने रूळ ओलांडण्याचे ठरवले. मात्र मध्येच मालगाडी उभी असल्याने त्याने मालगाडीवर चढून सामान पलिकडे नेण्याचे ठरवले. त्याचवेळी मालगाडी सुरू झाल्याने ऑस्टिन खाली पडला आणि मालगाडी अंगावरून गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

भिंतीलाही भगदाड

वसई पूर्वेकडून लोकांनी रूळावर जाऊ  नये यासाठी रेल्वे प्रशासनाने दगडी भिंत बांधली आहे. मात्र लोकांनी त्या भिंतीला भगदाड पाडून फलाटावर जाण्याचा मार्ग बनवला आहे, पण हा मार्ग त्यांच्या जिवावर बेतू शकतो याचा ते विचार करत नाहीत, असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.