अनुदानातून नाटय़गृह, शिव मंदिर परिसर सुशोभीकरण, क्रीडा संकुल

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील नाटय़गृह, क्रीडा संकुल आणि शिव मंदिर परिसराच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून ४७ कोटींचा निधी नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात ३१ कोटी रुपयांचे कार्यात्मक अनुदान तर १६ कोटींच्या मूलभूत अनुदानाचा समावेश आहे. महत्त्वाच्या तीनच प्रकल्पांसाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याने शहरातील महत्त्वाचे प्रकल्प वेळेत मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अंबरनाथ शहरात गेल्या काही वर्षांत विविध प्रकल्प रखडले आहेत. शहरातील सांस्कृतिक चळवळींचे केंद्र समजल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण खुल्या नाटय़गृहाची वास्तू जमीनदोस्त करून तेथे वाहनतळ उभारण्यात आले. त्यामुळे नाटय़गृह कधी उभारणार, असा सवाल कलाप्रेमींमधून उपस्थित केला जात होता. शिव मंदिर आर्ट फेस्टिव्हलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा कार्यक्रम अंबरनाथमध्ये होत असला तरी शिव मंदिर परिसराचा हवा तसा विकास झालेला नाही. त्याच वेळी क्रीडा रसिकांसाठी आवश्यक असलेल्या शहरातील महत्त्वाच्या अशा क्रीडा संकुलाचा प्रश्नही अनुत्तरित होता. या महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून वित्त आयोगातून निधीची उपलब्धता करण्याचे प्रयत्न सुरू होते. याला नुकतेच यश आले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानुसार केंद्र शासनाच्या १४व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून अंबरनाथ शहरातील महत्त्वाच्या अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांसाठी ४७ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात कार्यात्मक अनुदानातून ३१ कोटी तर मूलभूत अनुदानातून १६ कोटींचा समावेश आहे. या निधीतून नाटय़गृह, क्रीडा संकुल आणि शिव मंदिर परिसरात सुशोभीकरण आणि इतर विकासकामे केली जाणार आहेत.

अंबरनाथ नगरपालिका सभागृहात लवकरात लवकर ठराव करून या निधीचा वापर महत्त्वाचे प्रकल्प वेगाने उभारण्यासाठी केला जाईल.

– मनीषा वाळेकर, नगराध्यक्ष, अंबरनाथ