scorecardresearch

‘५० खोके.. घोषणा काश्मीरमध्ये पोहोचली’, उद्धव ठाकरे म्हणाले, “निष्ठेच्या पंघरुणाखाली लांडगे…”

ठाणे जिल्ह्यात आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन करण्यासाठी माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे आले असताना त्यांनी ५० खोके या घोषणेवरुन शिंदे गटावर टीका केली.

Uddhav Thackeary
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज ठाणे येथे खासदार राजन साळवी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरासाठी उद्घाटक म्हणून आले होते. यावेळी त्यांनी शिबिरात बोलत असताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. “आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलेलो आहे. काही दिवसांनी ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येईल. एका गोष्टीचे समाधान आहे. सध्या जो काही विकृतपणा आणि गलिच्छपणा राजकारणात आला आहे. तो दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही, याचा मला अभिमान आहे. अन्यायावर लाथ मारा, हे शिवसेनेचं ब्रिदवाक्य आहेत. त्याचसोबत शिवसेनाप्रमुखांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण शिकवले आहे. त्याप्रमाणे राजन साळवी हे समाजकारण करत आहेत, याचा आनंद वाटतो.”

५० खोके घोषणा आता काश्मीरमध्ये पोहोचली

अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत आहेत. बाकी जे विकाऊ होते, ते विकले गेले, काय भावाने विकले गेले तुम्हाला माहीत आहेच, असे सांगताच उपस्थित शिवसैनिकांमधून ५० खोकेच्या घोषणा सुरु झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भारत जोडो यात्रेतील प्रसंग सांगितला. मागच्या आठवड्यात संजय राऊत भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी जम्मू आणि काश्मीरमध्ये गेले होते. त्यानंतर त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला. काश्मीरमध्ये देखील लोक ५० खोकेच्या घोषणा देत आहेत. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात या घोषणा पोहोचल्या आहेत.

हे वाचा >> “ठाण्यातले निष्ठावान आणि अस्सल शिवसैनिक माझ्यासोबत, विकाऊ होते ते…” उद्धव ठाकरेंची टोलेबाजी

यावेळी आरोग्य शिबिरासाठी ज्यांनी योगदान दिले त्यांचे उद्धव ठाकरे यांनी आभार मानले. तसेच मुख्यमंत्री असताना अडीच वर्ष करोनाचे जागतिक संकट होते, अशी आठवणही त्यांनी सांगितली. अनाकलनीय संकट आल्यानंतर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले पाहीजे. त्यावेळी मंदिर बंद असल्यामुळे अनेकांनी माझ्यावर टीका केली. आम्हाला देवाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जायचे आहे, आमचा देव कुठे भेटेल? असा प्रश्न विचारला जात होता.

जितेंद्र आव्हाड वर जाऊन घंटा वाजवून आले

मी त्यांना एकच उत्तर दिले की, देव भेटतोय. तो डॉक्टर आणि नर्सेस यांच्या रुपाने देव आपले प्राण वाचवायला आला आहे. पोलिसांनी देखील अतिशय मेहनत घेतली. जितेंद्र आव्हाड तर करोनाच्या पहिल्या बॅचमध्ये वरती जाऊन घंटा वाजवून आले होते. आरोग्य हा फार महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे खासदार राजन साळवी यांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे मी कौतुक करतो. राजकारणाच्या घाणीत न पडता त्यांनी बाळसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे समाजकारण करण्याचा निर्णय घेतला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 13:51 IST