बनावट अधिवास दाखल्यांचा परिवहन खात्याला धसका
रिक्षासाठी लागणारे परमिट मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला जात असल्याचे प्रकरण ‘लोकसत्ता वसई-विरार’ने समोर आणल्यानंतर परिवहन खात्याने चांगलाच धसका घेतला आहे. परमिट देताना आता अत्यंत खबरदारी घेतली जात असून हजार अर्जापैकी केवळ ६०० जणांना परमिटचे वाटप करण्यात आले आहे. ३०० जणांचे परमिट रोखून धरले आहेत.
बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षाचालक अधिवास दाखले मिळवतात आणि त्याआधारे त्यांना परमिट मिळते. ‘लोकसत्ता वसई-विरार’ने हे प्रकरण प्रसिद्ध केल्यानंतर परिवहन खात्याने खबरदारी म्हणून प्रत्येक परमिट देताना कसून तपासणी सुरू केलेली आहे. विरारच्या उपप्रादेशिक परिवहन खात्याकडे एकूण १ हजार १३३ अर्ज आले होते, त्यांपैकी फक्त ६०० जणांना इरादापत्र देण्यात आले आहेत. ३०९ अर्जदारांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. १८१ अर्जदार गैरहजर राहिले होते, अशी माहिती विरार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी दिली.
याशिवाय प्रत्येक नव्या अर्जदाराचा अर्ज आला की त्याचे दाखले फेरतपासणीसाठी पुन्हा तहसीलदार कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर केवळ संशयितांचे अर्ज पडताळणीसाठी पाठवण्यात आले होते. आता प्रत्येक अर्ज पाठवून त्याची खातरजमा केली जात आहे.