कडोंमपाला उद्दिष्ट गाठण्यात अपयश; ‘ब’ प्रभाग पिछाडीवर
कल्याण- डोंबिवलीमहापालिकेला मालमत्ता कराचे उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले असून, तिजोरीमध्ये एकूण ३४५ कोटींपैकी २७१.८ कोटी रुपये जमा झाले आहेत. वर्षभर कामाची सवय नसलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वसुलीला लावण्यात आले होते. थकबाकीदारांच्या मालमत्ता सील करून लिलाव करण्यापर्यंत आटापिटा करूनही पालिकेला ७३ कोटींचा तोटा झाला आहे.
३१ मार्चअखेर कल्याण डोंबिवली पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या माध्यमातून २७१ कोटी ८७ लाख ७८ हजार ३९० रुपये जमा झाले आहेत. गुरुवारी दिवसभरात कर्मचाऱ्यांनी सुमारे २० कोटीची करवसुली केली.
मालमत्ता करात पालिकेला सुमारे १०८ कोटीचा तोटा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये आले होते. अखेर तोटय़ाचे भाकीत खरे ठरले आहे. गेल्या दोन महिन्यात कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेल्या धावपळीचे सामान्यांनी कौतुक केले आहे.
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीत मालमत्ता कराचे ३४५ कोटीचे लक्ष्य अर्थसंकल्पात ठेवण्यात आले होते. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी दर महिन्याला कर विभागाने सुमारे २७ कोटी रुपये वसूल करणे अपेक्षित होते. गेल्या वीस वर्षांत सुरुवातीचे दहा महिने फक्त आराम आणि नियमित कामे करायची आणि आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने उरले की मग, धावाधाव करायची, ही करवसुली कर्मचाऱ्यांना अनेक वर्षांपासून सवय लागली आहे. यावेळी प्रशासनाने करवसुलीसाठी आक्रमक भूमिका घेतल्याने, करवसुली केली नाही तर निलंबनाची भीती असल्याने कर कर्मचारी अहोरात्र करवसुलीच्या मागे लागले होते. यामुळे २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१६ या महिनाभरात कर कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या रेटय़ामुळे १३३ कोटीची विक्रमी करवसुली केली. पालिकेच्या इतिहासात एका महिन्यात एवढी करवसुली कधीच करण्यात आली नव्हती. फेब्रुवारी अखेपर्यंत प्रशासनाने फक्त १३९ कोटी वसूल केले होते. त्यामुळे दर महिन्याला पालिकेच्या सात प्रभागांसमोर ४ ते ५ कोटी करवसुलीचे आव्हान होते.
कर विभागात वर्षांनुवर्षे ठरावीक कर्मचारी काम करीत आहेत. त्यांचे थकबाकीदार, विकासक यांच्याशी साटेलोटे असल्याने करवसुलीतील हा एक मोठा अडथळा आहे. प्रशासनाने अशा ठाणमांडय़ा कर्मचाऱ्यांना अन्य विभागात बसविण्याची तयारी केली, तर करवसुलीसाठी चांगले प्रयत्न नवीन कर्मचाऱ्यांकडून होतील, अशी अपेक्षा काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
३४५ कोटीपैकी २७२ वसूल झाल्याने तिजोरीत ७३ कोटी कमी वसूल झाले आहेत. या कमी वसुलीचा विकासकामांच्या अंमलबजावणीवर परिणाम होणार आहे. सहा मालमत्तांच्या लिलावातून प्रशासनाला २८ कोटी २८ लाखांचा महसूल मिळाला
आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बडय़ा विकासकांचा ठेंगा
वर्षांनुवर्षे कर न भरण्याची काही बडय़ा विकासक, जमीनदार, धनदांडग्यांची मनोवृत्ती आहे. अशा धनदांडग्यांनी पालिकेचे मागील दहा वर्षांपासून सुमारे १३९ कोटी रुपये थकीत ठेवले आहेत. कराची चालू मागणी आणि थकीत रक्कम वसूल करणे हे कर्मचाऱ्यांसमोरील दरवर्षीचे आव्हान असते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 73 crore loss in property tax
First published on: 02-04-2016 at 01:59 IST