तब्बल १० करोनाबाधित महिलांचे सुखरूप बाळंतपण

भाईंदर : गेल्या पाच महिन्यांपासून करोनाच्या पाश्र्वभूमीवर मीरा-भाईंदरमधील शासकीय रुग्णालयात ८३३ महिलांची प्रसूती झाली. त्यात तब्बल १३ करोनाबाधित महिलांची प्रसूती करण्यात आली असून आई आणि बाळाला करोनामुक्त करण्यात पालिकेला यश आले आहे.

मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत शहरातील एकूण ११ हजार ३९५ रुग्णांना करोनाची बाधा झाली असून ३९५ रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे करोनाचा प्रसार अधिक होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. करोनाचा प्रसार प्रामुख्याने वृद्ध व्यक्ती आणि गरोदर महिलांना व लहान मुलांना होण्याची भीती असते. परंतु अशा परिस्थितीत देखील मीरा-भाईंदर शहरातील इंदिरा गांधी आणि पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात ८३३ महिलांची प्रसूती पार पडली आहे.

मीरा-भाईंदर शहरात महिलांची प्रसूती पंडित भीमसेन जोशी आणि इंदिरा गांधी रुग्णालयात होते. परंतु जोशी रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून घोषित केल्यानंतर संपूर्ण भार इंदिरा गांधी रुग्णालयातवर आला आहे.

गेल्या पाच महिन्यांत जोशी रुग्णालयात ६३, तर इंदिरा गांधी रुग्णालयात ७७० महिलांच्या प्रसूती झाल्या. यात महिला आणि बाळाला करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती हिवताप आरोग्य अधिकारी डॉ. लहाने यांनी दिली.

भाईंदर पश्चिम परिसरात आलेल्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. यात गेल्या पाच महिन्यांत उपचार घेत असलेल्या तब्बल १० महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व महिलांना आणि नवजात बाळांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.