कारवाईसाठी भाजपचे नेते कृपाशंकर यांचा पोलिसांना फोन ;भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही घेतली मारहाण झालेल्या व्यक्तीची भेट

ठाणे शहराजवळील दिवा भागात महाराष्ट्र- उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष सुशील पांडे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या निलेश पाटील यांच्यासह सात जणांवर मारहाणीचा आरोप करत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पांडे यांना मारहाण झाल्याचे कळताच भाजपने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे ठरविले आहे. बुधवारी भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी दिवा येथे येऊन पांडे यांची भेट घेतली. तसेच पोलिसांना संपर्क साधून कारवाई करण्याची मागणी केली. तर भाजपचे आमदार संजय केळकर यांनीही पांडे यांची भेट घेतली. काही दिवसांपूर्वीच ठाण्यातील वागळे इस्टेट भागात भाजपच्या पदाधिकाऱ्यास मारहाण प्रकरणी शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाविरोधात कारवाई करण्याची मागणी भाजपने केली होती. दिवा येथे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या क्लस्टरच्या आश्वासनावरून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर टिका केली होती. त्यामुळे राज्यात भाजप आणि शिंदे गटाची युती असली तरीही ठाण्यात मात्र शिंदे गट आणि भाजपतील अंतर्गत धुसफूस उफाळून येत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा >>>ठाणे : मोबाईल चोरला पण आरोपी दुचाकीवरून पडला, पोलिसांच्या ताब्यात येताच मोठी टोळी गजाआड, २० महागडे मोबाईल जप्त

दिवा येथील कार्यालयात असताना काही दिवसांपूर्वी निलेश पाटील आणि त्यांच्या साथिदारांनी कार्यालयात शिरून कोयत्याच्या मुठीने मारहाण केल्याचा आरोप सुशील पांडे यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे निलेश पाटील यांच्यासह सात जणांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या मारहाणीनंतर भाजपच्या दिवा येथील पदाधिकाऱ्यांनी निलेश पाटील यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. निलेश पाटील हे पूर्वी भाजपचे पदाधिकारी होते. सुमारे वर्षभरापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही ते जवळचे मानले जातात.

हेही वाचा >>>ठाणे : कल्याण-डोंबिवली परिसरातून १३ दुचाकी चोरणाऱ्याला भिवंडीतून अटक, कल्याण गुन्हे शाखेची कारवाई

असे असले तरी पांडे यांनी तक्रार दिल्यानंतर मंगळवारी सायंकाळी भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी त्यांची भेट घेतली. तसेच त्यांनी मुंब्रा पोलिसांना संपर्क साधून कारवाईची करण्यासही सांगितले. त्यानंतर भाजपचे ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनीही पांडे यांची भेट घेऊन भाजप त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही महिन्यांपूर्वी ठाण्यात भाजपच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण झाली होती. त्यानंतर भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका निकटवर्तीय माजी नगरसेवकावर कारवाई करण्यासाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. दिवा येथे एका कार्यक्रमात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिव्यात क्लस्टर योजना सुरू करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर भाजपचे दिव्याचे शहराध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी म्हस्के यांच्यावर आरोप केले होते. त्यामुळे ठाण्यात शिंदे गट आणि भाजपमधील धुसफूस उफाळून येऊ लागली आहे.