घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ज्या ग्राहकांनी आपल्या आधारकार्डची नोंदणी नियमित सिलिंडर मिळणाऱ्या एजन्सीत केली नाही अशा ग्राहकांना एजन्सीने सिलिंडर देण्यास नकार दिला आहे. आधी आधारकार्डची नोंदणी करा, मगच घरगुती सिलिंडर पाठवण्यात येईल, अशी उत्तरे अनेक ग्राहकांना एजन्सी चालकाकडून देण्यात येत आहेत.
घरातील सिलिंडर संपल्याने काही ग्राहकांनी गॅस एजन्सीत सिलिंडरची नोंदणी केली. या ग्राहकांनी आधारकार्डची नोंदणी एजन्सीत केली नसल्याने त्यांना सिलिंडर देण्यास एजन्सीने नकार दाखवला आहे. सिलिंडरची नोंदणी करून पंधरा दिवस झाले आहेत. तरीही त्या ग्राहकांना एजन्सीकडून सिलिंडर देण्यात येत नाही. पहिले आधारकार्डची नोंदणी करा मग सिलिंडर घरी पाठवण्यात येईल, असे उत्तर एजन्सीतून ग्राहकांना देण्यात येत आहे. अनेक ग्राहकांनी आधारकार्डसाठी अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप त्यांना मिळाली नाहीत. अनेकांच्या आधारकार्ड काढल्याच्या पावत्या हरवल्या आहेत. त्यामुळे एजन्सीत दाखवण्यासाठी आधारकार्डाचा कोणताही पुरावा नसल्याने अनेक ग्राहकांची अडचण झाली आहे. सिलिंडरसाठी आधारकार्ड सक्तीचे नाही असे सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ‘तुम्ही आधारकार्डची सक्ती का करता’ असे प्रश्न ग्राहकांना एजन्सी चालकांना करण्यात येत आहेत. त्यावर एजन्सी चालकांकडून ‘ आधारकार्डची नोंदणी करून घ्या’ असे आदेश आहेत, अशी उत्तरे दिली जात आहेत. मार्चअखेर गॅस ग्राहक व आधारकार्ड नोंदणीची सर्व माहिती वरिष्ठ कार्यालयाला पाठवायची आहे. त्यामुळे ग्राहकांकडे आम्ही बँक खाते क्रमांक व आधार क्रमांक मागत आहोत, असे सांगण्यात आले. मार्चअखेपर्यंत आधार क्रमांकाची एजन्सीत नोंदणी करण्याचे केंद्र सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही. त्यांनी बँक खाते क्रमांक एजन्सीत द्यावयाचा आहे, असे शासनाकडून वेळोवेळी स्पष्ट करूनही एजन्सी ग्राहकांची अडवणूक करीत आहेत.