मूळचे अडीच हजार किमी लांबीचे नर्मदा पात्र त्यावरील १६ अवाढव्य धरणांमुळे वाढून साडेतीन हजार किलोमीटपर्यंत वाढले आहे. उन्हाळ्याच्या मोसमामध्ये सुरू केलेली नर्मदेची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. या अनोख्या प्रवासात मानवी मनांचे-आचारविचारांचे बहुविध पैलू अनुभवता आले, असे आरती जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने चेंदणी कोळीवाडा कोळी जमात ट्रस्टच्या पुरातन श्री दत्त मंदिरात बुधवारी विविध कार्यक्रम झाले. या वेळी परिक्रमा पूर्ण केलेल्या ठाण्यातील आरती जोशी आणि डॉ. मृणाल घैसास यांनी ठाणेकरांशी संवाद साधला.
नर्मदेच्या प्रवासात मानवी मनांचे, आचारविचारांचे बहुविध पैलू अनुभविता आले. भेटलेले वाटसरू, स्थानिक आणि साधुसंत या साऱ्यांच्या मनातील आणि वागण्या-बोलण्यातील सरळपणा मनास भावला. वर्तमानात कसे जगावे याचा हा वस्तुपाठच घालून दिला. परिक्रमेच्या खडतर प्रवासात कुत्रा, भारद्वाज पक्षी, टिटवी, मोर, लांडगे, कोल्हे, माकडे यांसारख्या प्राण्यांचाही सहवास अनुभवता आला. वाटेत कुठे गरम जेवण मिळाले तर कुठे कोरडय़ा शिधेवर भूक भागवावी लागली, अशा शब्दांत डॉ. घैसास यांनीही आपले अनुभव कथन केले.