ठाण्याला सहकारी तत्त्वावर गृहनिर्मितीला सुरुवात झाली ती १ सप्टेंबर १९४८ साली, आनंदाश्रम कॉलनीच्या निमित्ताने. या गृहसंकुलाने अनेक आदर्श, संकेत अन्य सोसायटय़ांसमोर घालून दिलेत. ठाण्यातील सुरुवातीच्या काळातील गृहनिर्माण संस्थांनी त्याचे अनुकरणही केले.
जमिनीची अनुपलब्धता आणि परिणामी जनसामान्यांच्या दृष्टीने प्रतिदिनी गगनाला भिडणाऱ्या जमिनीच्या किमती यामुळे निवासी घरांच्या समस्येवर एक चांगला तोडगा म्हणून सहकारी पद्धतीने गृहनिर्मिती ही नामी युक्ती आहे. सहकारी गृहनिर्मितीचे एक पेवच फुटलेले सर्वत्र दृष्टीस पडते. अर्थात सुरुवाती-सुरुवातीला केवळ एक सामाजिक गरज भागविण्याच्या उदात्त हेतूने सुरू झालेली ही चळवळ आजमितीला सर्वत्रच बिल्डरांचा एक ‘व्यवसाय’ होऊ पाहत आहे.
मुंबई महानगरीतील पहिली गृहनिर्माण सोसायटी म्हणून १९१४ साली स्थापन झालेल्या रा. ब. तालमाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या बॉम्बे को-ऑप. हौसिंग असोसिएशनचा उल्लेख केला जातो. ठाण्याला सहकारी तत्त्वावर गृहनिर्मितीला सुरुवात झाली ती १ सप्टेंबर १९४८ साली, आनंदाश्रम कॉलनीच्या निमित्ताने. नौपाडा हा आज ठाण्यातील ‘प्राइम लोकॅलिटी’ असलेला भाग त्या वेळी नौपाडा ग्रामपंचायतीच्या कक्षेत मोडत होता. जेमतेम ज्याला ‘रस्ता’ म्हणता येईल अशा गर्द झाडीने वेढलेल्या या भागात जनसामान्यांसाठी एक गृहसंकुल सहकारी तत्त्वावर उभे करायचे, असे स्वप्न गजानन विश्वनाथ पटवर्धन या तेथील एका नागरिकाला पडले. एका स्थानिक दैनिकाच्या ५ जून १९४८ च्या अंकात त्यासंबंधी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि त्याला अनुकूल प्रतिसादही मिळाला. पण तो काळ असा होता की, अशा पद्धतीच्या गृहनिर्मितीवर लोकांना फारसा विश्वास वाटत नव्हता. सोसायटीला पुरेसे सभासदही मिळण्याची पंचाईत झाली. ‘भाडेकरू’ म्हणून राहणेच लोक पसंत करीत. तीन संकल्पित चाळींपैकी एका चाळीपुरते सभासद जमा झाले आणि कामाला सुरुवात झाली. पुरेसे भांडवल मूठभर सभासदांकडून जमणे अशक्य होते. मग (तत्कालीन) शासनाकडून कर्ज घेणे क्रमप्राप्त होते. अडचण अशी झाली की, तत्कालीन नियमांनुसार मुंबईतल्या सहकारी सोसायटीलाच फक्त तत्कालीन शासन कर्ज देऊ शकत होते. म्हणून मग ‘आनंदाश्रम कॉलनी’ हे मूळ नाव बदलून ‘द बॉम्बे ठाणा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीची आनंदाश्रम कॉलनी’ असे नाव देण्यात आले. त्यामुळे कर्जाचे काम होऊन ‘आनंदाश्रमाची’ मुहूर्तमेढ उभी राहिली. १९४९ साली नोव्हेंबर महिन्यातल्या १५ तारखेला पहिल्या चाळीतले सभासद राहायला आले. १९५० ते १९५४ या काळात आणखी दोन चाळी जोडण्यात आल्या. इतक्या सगळ्यांसाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहे या दोन मोठय़ाच गरजा होत्या. त्या काळात नगरपालिकेचा पाणीपुरवठा असा फारसा प्रकार नव्हताच. कूपनलिका हा एकमेव खात्रीशीर उपाय. त्याचाच अवलंब या मंडळींना करावा लागला. प्रत्येकाच्या ‘घरात’ शौचालय असा विचार डोक्यात येणेही त्या काळात संभवनीय नव्हते आणि ते मान्यही झाले नसते. गृहसंकुलाच्या एका बाजूला प्रथम ओळीने दहा शौचालयांचे बांधकाम केले गेले. पुढे सदस्य-संख्या वाढल्यानंतर त्यावर आणखी दहांचा एक ‘मजला’ वाढविला गेला. अशा या प्रकाराचा अवलंब केला गेला तो केवळ गरजेपोटी. आजमितीला मात्र आनंदाश्रमाने याबाबतीत अत्याधुनिकता अंगीकारली आहे.
आनंदाश्रमाचे सर्व सहकारी गृहसंकुलांनी अनुकरण करावे, नव्हे केलेच पाहिजे, अशी एक उल्लेखनीय बाब येथे सांगितलीच पाहिजे. ती म्हणजे आजही तेथे जाणवणारे सौहार्दाचे वातावरण. येथील सभासदांच्या घरांची दारे २४ तास सताड उघडी असतात. शेजारपाजारचे कोणीही, केव्हाही हक्काने इतरांच्या ब्लॉकमध्ये सहजगत्या जातात. दूरदर्शन संचांचा ढणढणाट, घरातल्या लोकांची मोठय़ा आवाजातली संभाषणे, लहानग्यांचा आरडाओरडा यातील कशाचाही येथे मागमूसही आढळणार नाही. अशा आदर्श संकेतांमुळेच हे गृहसंकुल डॉक्टर, संख्याशास्त्रज्ञ, लेखक, आदर्श शिक्षक अशा गुणिजनांची भेट ठाणेकरांना वर्षांनुवर्षे देऊ शकले. येथील निरामय शांतता आणि स्वच्छता यांचे ठाण्यातील सर्व सहकारी गृहसंकुलांनी अनुकरण करायला हवे. ठाण्यातील सुरुवातीच्या श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, वंदना सोसायटी यांसारख्या काही अन्य जुन्याजाणत्या सोसायटय़ांनी ‘आनंदाश्रमा’ने घालून दिलेले हे संकेत आवर्जून लक्षात ठेवले आहेत. इतर नवोदितांनीही असे केले, तर ठाणे म्हणजे ‘आनंदी आनंद गडे..’ अशी स्थिती होईल यात काय संशय!
अरुण जोशी
(आभार : आनंदाश्रम कॉलनी स्मरणिका)
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2015 रोजी प्रकाशित
भूतकाळाचे वर्तमान : ठाण्यातील सहकारी गृहनिर्माणाची मुहूर्तमेढ
ठाण्याला सहकारी तत्त्वावर गृहनिर्मितीला सुरुवात झाली ती १ सप्टेंबर १९४८ साली, आनंदाश्रम कॉलनीच्या निमित्ताने. या गृहसंकुलाने अनेक आदर्श, संकेत अन्य सोसायटय़ांसमोर घालून दिलेत.

First published on: 21-02-2015 at 12:14 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: About co operative housing societies in thane