ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांचा प्रवास ठाणेकरांना आरामदायी आणि सुखकर वाटू लागला असतानाच या बसचालकांच्या बेशिस्तीमुळे वारंवार किरकोळ अपघात घडू लागल्याने ठाणेकरांपुढे नवी डोकेदुखी उभी राहिली आहे. ठाणे शहराला भेदणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या तिन्ही मुख्य चौकात प्रवासी मिळविण्याकरिता रस्त्याच्या मधोमध बसगाडय़ा उभ्या केल्या जात असून यामुळे शहरातील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्याचबरोबर रस्त्यामध्ये अचानक बस थांबविण्यात येत असल्याने या बसला धडक बसून अपघात होण्याचे प्रकार वाढू लागले आहे.
ठाणे महापालिका परिवहन उपक्रम ठाणेकरांना दळणवळणासाठी दर्जेदार आणि चांगली सुविधा देण्यात अपयशी ठरल्याने प्रवासी रिक्षा आणि खासगी बसकडे वळले. प्रवासी संख्येमुळे काही रिक्षाचालकांची मुजोरी वाढली असून ते प्रवासी भाडे नाकारतात. यामुळे कोपरी ते घोडबंदर मार्गावर सतत फेऱ्या करणाऱ्या खासगी बसगाडय़ांना विशेष महत्त्व आले. रिक्षापेक्षा कमी पैसे मोजावे लागत असल्याने अनेक प्रवासी खासगी बसकडे वळला असून त्यांना हा प्रवास आरामदायी आणि सुखकर वाटू लागला आहे. असे असले तरी या बसचालकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असून यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
या पाश्र्वभूमीवर शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक वैती यांनी वाहतूक शाखेला पत्र देऊन या बसगाडय़ांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर
ठाणे शहराला भेदणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावरील तीन हात नाका, नितीन कंपनी आणि कॅडबरी या तिन्ही मुख्य चौकातून दिवसभर खासगी बसच्या फेऱ्या सुरू असतात. या तिन्ही चौकात महामार्गालगत बस थांबा असल्याने येथे प्रवासी उभे असतात. मात्र, या थांब्यांवर बस उभी करण्यास मज्जाव असल्याने प्रवासी मिळविण्यासाठी खासगी बसचालक रस्त्याच्या मधोमध बसगाडय़ा उभ्या केल्या जातात. तसेच चौकातून अंतर्गत रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावरच या बसगाडय़ा उभ्या केल्या जातात. यामुळे महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे.
जीवघेणा प्रवास
खासगी बसगाडय़ांचा प्रवास ठाणेकरांना आरामदायी आणि सुखकर वाटू लागला असला तरी हे बसचालक मुंबई-नाशिक महामार्गावरील सिग्नल वाचविण्यासाठी उड्डाण पुलाच्या पायथ्याशी बस उभी करतात आणि प्रवाशांना तेथेच उतरवितात. यामुळे या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना महामार्ग ओलांडावा लागतो. महामार्गावर वाहनांचा वेग जास्त असतो. यामुळे हा प्रवास जीवघेणा ठरू लागला आहे. त्याचबरोबर वाहन पाठीमागून भरधाव येणारे वाहन बसवर आदळून अपघात होऊ शकतो.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2015 रोजी प्रकाशित
आरामदायी नव्हे, अपघातदायी!
ठाणे पूर्व स्थानक ते घोडबंदर या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसगाडय़ांचा प्रवास ठाणेकरांना आरामदायी आणि सुखकर वाटू लागला असतानाच या
First published on: 26-02-2015 at 12:05 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accidents cases increased in new thane due to private transportation