सलग साप्ताहिक संवादाचा ७५० वा टप्पा
सोशल माध्यमांच्या भाऊगर्दीत प्रत्यक्ष संवाद दुर्मीळ होत असल्याची ओरड होत असताना ठाण्यातील आचार्य अत्रे कट्टय़ावरील मुक्त संवाद मैफलींच्या उपक्रमाने १६ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. दर बुधवारी संध्याकाळी नौपाडय़ातील भास्करनगरमधील जिजाऊ उद्यानात विविध विषयांवरील व्याख्याने, मुलाखती, संगीत मैफलींचा उपक्रम गेली १५ वर्षे सलगपणे राबविला जात आहे. या दीड दशकात कट्टय़ावर नियमितपणे आयोजित झालेल्या ७४९ कार्यक्रमांना ठाणेकरांनी उपस्थित राहून दाद दिली. आता ७५० व्या टप्प्यानिमित्त तीन विशेष कार्यक्रम कट्टय़ातर्फे सादर केले जाणार आहेत.
त्यातील पहिला कार्यक्रम येत्या बुधवारी ४ मे रोजी संध्याकाळी सहा वाजता कट्टय़ावर होत असून त्यात कट्टय़ाच्या एक संस्थापक सदस्या संपदा वागळे यांच्या ‘सत्पात्री दान’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीतील सत्पात्री दान या लेखमालेतील लेखांचा हा संग्रह आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख, मौज मासिकाच्या संपादिका मोनिका गजेंद्रगडकर, लोकसत्ताच्या फीचर्स एडिटर आरती कदम, सुमन रमेश हलसियानी चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त सुमन हलसियानी यावेळी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी सर्व रक्कम अहमदनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या मनोरुग्ण व अनाथ स्त्रियांना सांभाळणाऱ्या संस्थेला मदत म्हणून दिली जाणार आहे.
‘दान करी रे’ हा दुसरा विशेष कार्यक्रम रविवार ८ मे रोजी सकाळी दहा ते दुपारी १ यावेळेत नौपाडय़ातील सरस्वती क्रीडासंकुल येथे होईल. या कार्यक्रमाचे संहिता लेखन, निरूपण धनश्री लेले करणार असून श्रीरंग भावे, मंदार आपटे व प्रीती निमकर गाणी सादर करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाण्यांची मैफल
रविवार १५ मे रोजी गडकरी रंगायतनमध्ये सकाळी ११ वाजता ‘हृदयी प्रीत जागते’ ही गाण्यांची मैफल होईल. नीलेश निरगुडकर, कश्मिरा राईलकर व अनुजा वर्तक हे गायक कलावंत या मैफलीत सहभागी होणार आहेत. निवेदन दीपाली केळकर करणार आहेत. डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय ओक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. या तिन्ही कार्यक्रमांना रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Acharya atre katta thane
First published on: 03-05-2016 at 00:05 IST