ठाणे शहरातील नाले तसेच पदपथांवरील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई महापालिकेमार्फत शहरात सुरू असून गेल्या तीन दिवसांत नाल्यांवरील २१ तसेच पदपथांवरील १,२७१ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. सोमवारपासून सुरू झालेली कारवाई सलग चार दिवस सुरू असल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तसेच या कारवाईमुळे शहरातील अनेक भागांतील पदपथांनी मोकळा श्वास घेतल्याचे चित्र आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील नाले तसेच पदपथांवर मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले असून यामुळे रहिवाशांना पदपथावरून चालणे कठीण होत आहे. त्यासंबंधी महापालिका प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी येत आहेत. या पाश्र्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश उपायुक्त तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांना दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या सर्वच प्रभाग समितीस्तरावर सोमवारपासून कारवाई सुरू झाली. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सातत्याने सुरू आहे. दरम्यान, ही कारवाई सातत्याने सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधितांना दिले आहेत.