ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरांतील अतिधोकादायक ठरवण्यात आलेल्या ५८ इमारती पाडण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सोमवारी रात्री दिले. या इमारतींवर पावसाळय़ापूर्वी कारवाई झाली पाहिजे, असे बजावतानाच रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामात कुचराई झाल्यास संबंधित कार्यकारी अभियंत्यांना दोषी धरण्यात येईल, अशी तंबीही जयस्वाल यांनी रात्री उशिरा घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने शहरातील इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक व धोकादायक इमारतींची सविस्तर यादी तयार केली आहे. या यादीनुसार शहरातील अतिधोकादायक इमारती आकडा ५८ तर धोकादायक इमारती आकडा २,५६६ इतका असल्याचे समोर आले आहे. महापालिकेने गेल्या वर्षी जाहीर केलेली आणि यंदाच्या सर्वेक्षणाची आकडेवारी जवळपास सारखीच असल्याचे दिसून येते. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही महापालिकेने यादीतील अतिधोकादायक इमारतींवर प्रत्यक्षात कारवाई सुरू केली नव्हती. असे असतानाच दीर्घ रजेनंतर सोमवारपासून पुन्हा रुजू झालेले आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. या बैठकीत त्यांनी ३१ मेपूर्वी अतिधोकादायक इमारती पाडण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
खड्डे बुजवा
ठाणे शहरात विविध कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर तयार झालेले खड्डे पावसाळय़ापूर्वी बुजवण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या. या कामात काही कुचराई झाली तर संबंधित कार्यकारी अभियंत्याला जबाबदार धरण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची तात्काळ दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या.