‘अशी ही बनवाबनवी’ आणि ‘आयत्या घरात घरोबा’ हे चित्रपट पाहिल्यानंतर अशोक सराफ यांच्या अभिनयाने भारावून गेलेला आणि आपणही सिनेमात अशोकमामांसारखे काम करायचे अशी महत्त्वाकांक्षा बाळगणारा अभिनेता मंगेश देसाई याने नाटक, मालिका, चित्रपटांतून विविध प्रकारच्या छोटय़ामोठय़ा व्यक्तिरेखा साकारल्या. ‘खेळ मांडला’ चित्रपटाच्या यशानंतर मंगेशला थेट दक्षिण आफ्रिकेतील दिग्दर्शकाने ‘फ्री स्टेट’ नावाच्या इंग्रजी सिनेमात भूमिका दिली. शिवाजी पाटील दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपटात मंगेश देसाई झळकणार असून राजेश देशपांडे लिखित-दिग्दर्शित आगामी नाटकही तो करणार आहे.
* आवडती नाटकं- ‘वाडा चिरेबंदी’ ९ तासांचे चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित नाटक. सगळ्या पात्रांना नऊ तास एका प्रयोगात बांधून ठेवले होते. मराठी रंगभूमीला पुन्हा जोमात आणणारे देवेंद्र पेमचे ‘ऑल दी बेस्ट’.
* आवडते मराठी चित्रपट- ‘अशी ही बनवाबनवी’, ‘झकास’.
* आवडते हिंदी चित्रपट- ‘सदमा’ हा चित्रपट खूप भावला. रणबीर कपूर-कतरिना कैफ यांचा ‘अजब प्रेम की गजब कहानी’.
* आवडलेली मालिका- ‘असंभव’.
* माझी आवडलेली भूमिका- मिली ही ‘हॅपी बर्थ डे’ नाटकातली न्यूनगंडातून निर्माण झालेली व्यक्तिरेखा मला खूप आवडली. ‘खेळ मांडला’ चित्रपटातील दासू ही व्यक्तिरेखा.
* आवडते दिग्दर्शक- नाटकासाठी विजय केंकरे आणि चंद्रकांत कुलकर्णी. सिनेमातील राजीव पाटील, विजू माने.
* आवडते नाटककार- प्र. ल. मयेकर आणि अलीकडे संतोष पवार.
* आवडते पुस्तक- अनंत सामंत यांचे ‘मितवा’. सध्या ‘कल्पांत’ हे सुहास शिरवळकर लिखित पुस्तक वाचतोय.
* आवडता खाद्यपदार्थ-  गुलाबजाम.
* आवडते फूडजॉइण्ट्स-  कुठल्याही ठिकाणच्या भय्याची पाणीपुरी.
* आवडते हॉटेल- लुईसवाडी येथील ‘टेंजोटेम्पल’.
* ठाण्याविषयी थोडेसे- ठाण्यात पहिल्यांदा राहायला आलो १९९६ साली. लुईसवाडीत मामांच्या घरी राहत होतो. ‘स्ट्रगलिंग’चा काळ सुरू होता. मराठी मध्यमवर्गीय विचारसरणीची माणसं भेटली. आपुलकीने वागणारी माणसं मला ठाण्यात भेटली. त्यांच्याशी ऋणानुबंध जुळले. आपल्या अडीअडचणीच्या काळात आपल्या हाकेला धावून येणारे लोक आपल्या आजूबाजूला असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माझ्या अभिनय वाटचालीला दिशा देणारी माणसंही मला ठाण्यातच भेटली. त्यामुळे शूटिंग किंवा प्रयोग करण्यासाठी कुठेही लांब जावं लागलं तरी ठाण्यात राहणंच मनापासून आवडतं. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी राहण्याचा मी विचारच करू शकत नाही. गडकरी रंगायतन हे एकच नाटय़गृह पूर्वी होतं. प्रयोग निश्चित रंगतो असं हे नाटय़गृह आणि इथला रंगमंच आहे. त्याचा अनुभव मी घेतला आहे. गडकरी रंगायतनमध्ये प्रेक्षकांची मिळणारी उत्स्फूर्त दाद यामुळेही मला ठाणे शहर खूप आवडते.
संकलन : सुनील नांदगावकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actor mangesh desai favourite things
First published on: 28-03-2015 at 12:20 IST