महापालिकेत लाखो रुपयांचा भरणा करून जाहिरात फलकांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्या ठेकेदारांनी यावेळी उमेदवारांची गय न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी राजकीय बळाचा वापर करून ठेकेदारांना दटावून त्यांच्या जाहिरात फलकावर आपले प्रचाराचे फलक बिनधास्तपणे उमेदवार लावत होते. यावेळी महापालिका निवडणुकीत ठेकेदारांनी आपल्या जाहिरात फलकावर कोणीही बेकायदा फलक लावला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या नोटिसा फलकावर चिकटवून ठेवल्या आहेत.
पत्रीपूल हा सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्यावर आपला फलक असावा म्हणून आमदार, नगरसेवक, पदाधिकारी धडपडत असतात. या फलकांसाठी ठेकेदाराने पालिकेत लाखो रुपये भरणा केलेले असतात. परंतु या फलकांवर राजकीय व्यक्तीने फलक लावला की तो ठेकेदाराला फलकाचा दर देण्यास टाळाटाळ करतो. ठेकेदाराने पैसे मागण्याचा तगादा लावला की त्याला दटावले जाई. त्यामुळे ठेकेदार वाद नको म्हणून राजकीय तोटा सहन करून राजकीय फलक लावून देण्यात मुभा देत होते. यावेळी ठेकेदारांनी आक्रमक भूमिका घेऊन आपल्या फलकावर राजकीय फलक लावताना आपली परवानगी घ्यावी अन्यथा नियमबाह्य़ फलक लावल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

राजकीय व्यक्ती फलक लावताना परवानगी घेत नाहीत. निवडणूक आयोगाने विचारणा केली की पहिली कारवाई ठेकेदारावर केली जाते. मागील निवडणुकींवेळी फलकांची घाण काढण्याचे काम आम्हाला रात्रभर करावे लागले होते. त्यामुळे यावेळी आम्ही ही कडक भूमिका घेतली आहे.
– एक जाहिरात ठेकेदार