तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन दक्ष

खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्यास त्यांना जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे.

रुग्णशय्या, प्राणवायू पुरवठय़ात वाढ; दोन हजार जम्बो सिलिंडरची खरेदी

ठाणे : करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेऊन संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी रुग्ण उपचाराच्या खाटांची संख्या वाढविण्याबरोबरच प्राणवायूच्या पुरवठय़ात तिप्पटीने वाढ करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा प्रशासनाने आखले आहे. या नियोजनानुसार रुग्ण उपचार खाटांच्या संख्येत दोन ते अडीच हजाराने वाढ होणार असून त्याचबरोबर प्राणवायूचा पुरवठा ६५७ टन केला जाणार आहे.

खासगी रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्यास त्यांना जम्बो सिलेंडरच्या माध्यमातून प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन हजार जम्बो सिलेंडर खरेदी करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, सर्वच खासगी रुग्णालयांना प्राणवायूपुरवठय़ाबाबत कंपन्यांशी करार करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

ठाणे जिल्ह्य़ात सध्या दररोज २५० ते ३०० करोनाबाधित आढळून येत आहे. दुसरी लाट ओसरली असली तरी आरोग्य विभागाने करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नियोजन आखले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये रुग्ण उपचारादरम्यान जाणवलेल्या उणिवा तसेच प्राणवायूचा तुटवडा हे सर्व लक्षात घेऊन हे नियोजन आखण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्य़ात ८६ हजारांच्या आसपास सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी १२ टक्के म्हणजेच १० हजार ४०७ रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता भासत होती. त्यातील २५ टक्के म्हणजेच २६०० रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. उर्वरित रुग्ण प्राणवायूच्या खाटांवर उपचार घेत होते. त्या वेळेस जिल्ह्य़ात २१९ टन प्राणवायूचा पुरवठा केला जात होता. त्यातील २० टन प्राणवायू करोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांकरिता वापरला जात होता, तरीही प्राणवायूचा तुटवडा मोठय़ा प्रमाणात जाणवत होता. तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात असून या पार्श्वभूमीवर प्राणवायूच्या पुरवठय़ात तिपटीने म्हणजेच ६५७ टन वाढ करण्याचे नियोजन आखले आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

प्राणवायूच्या पुरवठय़ाचे नियोजन

ठाणे जिल्ह्य़ात तीन प्रकारे प्राणवायूचा पुरवठा केला जातो. त्यात द्रव स्वरूपातील प्राणवायू, हवेतून निर्माण केला जाणारा प्राणवायू आणि जम्बो सिलिंडरद्वारे पुरवठा होणाऱ्या प्राणवायूचा समावेश आहे. जिल्ह्य़ामध्ये द्रव स्वरूपातील प्राणवायू विविध कंपन्यांकडून घेतला जात असून त्याद्वारे ७० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. महापालिका आणि जिल्हा रुग्णालयाने हवेतून प्राणवायू निर्माण करणारे प्रकल्प उभारले असून त्यातून २० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. जम्बो सिलिंडरद्वारे १० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच ज्या मोठय़ा रुग्णालयांना शक्य असेल तर त्यांना प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याची सूचना केली आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष

ठाणे जिल्ह्य़ात १४ हजारांच्या आसपास करोना रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत. त्यामध्ये आणखी दोन ते अडीच हजार खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. याशिवाय मनोरुग्णालयाजवळील आरोग्य विभागाच्या इमारतीत लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात येणार आहे. गरज पडल्यास जिल्हा रुग्णालयातही अशाच कक्ष तयार करण्यात येईल आणि येथील रुग्णांना सावद किंवा इतर रुग्णालयात हलविण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Administration vigilant for the third wave corona virus ssh

Next Story
स्वस्त डायलिसिससाठी पालिकेचा पुढाकार
ताज्या बातम्या