मुंबईत गेल्या २४ तासांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे ठाण्यातील सर्व धरणांचे पाणी ओसंडून वाहू लागले आहे. या धरणांमध्ये कोकण प्रदेश पालघर जिल्ह्यातील धामणी, कवडास, वांद्री ही धरणं १०० टक्के भरून दुथडी वाहत आहेत. तर कोकण प्रदेश आणि बृहमुंबईमधील महानगर पालिकेकडील तलाव मोदक सागर, तानसा एम.आय.डी.सी. मधील बारवी धरण १०० टक्के भरले आहे.

ठाण्याचे भातसा धरण हे ९३.६४ टक्के भरले आहे. त्यामुळे भविष्यात ठाणे आणि मुंबई या ठिकाणच्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात सुटणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील पावसाचा जोर पुढे २४ तास देखील कायम राहणार आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तानसा परिसरात सोमवारी रात्रीपासून मंगळवार दुपारपर्यंत १९५ मिमी पाऊस झाला. यावेळी धरणाचे ३८ स्वयंचलित दरवाजे उघडले होते. सध्या १६ दरवाजे उघडे असून उर्वरित बंद करण्यात आले आहेत.
तानसा परिसरातील गावांना सोमवारपासूनच सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता मुंबईच्या तुलनेत पावसाचा जोर बराच कमी असल्याने काही दरवाजेही बंद करण्यात आले असून कोणत्याही गावाला धोका नाही, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण क्षेत्रात १०१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मोडक सागर धरणात ८६ मिलीमीटर पाऊस पडला. बारवी येथे ६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघरमधील धामणी येथे १८० मिलीमीटर तर कवडास येथे १८० मिलीमीटर, तर वांद्री येथे ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर पाहता काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्याचे आदेश जिल्हाधिकारी प्रशासनाकडून देण्यात आली आहे.