अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी म्हणून दर्जा मिळावा, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, त्यांना निवृत्ती वेतन लागू व्हावे या मागण्यांसाठी अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचाऱी संघाच्या वतीने लढा सुरू आहे. या मागण्यांकडे राज्य सरकारचे तसेच प्रशासनाचे लक्ष वेधावे यासाठी २० ते २५ जून दरम्यान यवतमाळ ते अमरावती पर्यंत अंगणवाडी कर्मचारी पदयात्रा काढणार आहेत. या पदयात्रेच्या अनुषंगाने सोमवारी ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विश्रामगृहाबाहेर थाळीनाद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील दीड ते दोन हजार कर्मचारी उतरले होते.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अंगणवाडी केंद्रातील बालकांना आहार व शिक्षण देणे, गरोदर तसेच स्तनदा मातांना आहार वाटप करणे आणि त्यांच्या आरोग्याची माहिती देणे अले दैनंदिन कामे करतात. परंतू, या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अद्यापही शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा प्राप्त झालेला नाही, त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही तसेत त्यांना निवृत्ती वेतनही लागू करण्यात आलेले नाही. या मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी वर्षानुवर्ष आंदोलन करत आहेत. परंतू, सकरारकडून त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे.

या मागण्याकडे सरकराचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघामार्फत २० ते २५ जून दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषद ते महिला व बालिवकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावतीच्या कार्यालयापर्यंत अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी दिली. या पदयात्रेच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील विश्रामगृहाबाहेर थाळीनाद आंदोलन केले. या आंदोलनात जिल्ह्यातील दीड ते दोन हजार कर्मचारी उतरले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन कर्त्यांनी निवेदन सादर केले.