आज आपल्या सर्वाचे जीवन एवढे गतिमान झाले आहे की स्वत:साठी आणि कुटुंबासाठी देण्यासाठी आपल्याकडे वेळच नाही. त्यातूनच आपण निवांत क्षणांच्या शोधात असतो. शहरातील हॉटेलात किंवा पर्यटनस्थळी फारच गर्दी असते. वॉटर रिसॉर्ट्स तर जत्रेसारखे गजबजलेले असतात. तिथे निवांतपणा आणि माहिती अजिबात मिळत नाही. थोडा निवांतपणा, शांतता ही आपली आजची गरज कृषिपर्यटनातून भागू शकते. आपल्या ठाणे जिल्ह्य़ात अशी अनेक कृषी पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत, होत आहेत.
कृषी पर्यटनामधून शेतकऱ्याला कृषिपूरक उद्योग होऊन आर्थिक मदत होते. तसेच त्याच्या गुणवत्तापूर्ण कृषी उत्पादनाला जागेवरच ग्राहक मिळतो. निसर्ग, शेती, पर्यावरण यांची माहिती आणि त्यांचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध असणाऱ्या अशा मोजक्याच कृषी पर्यटन केंद्रांमध्ये चंद्रशेखर भडसावळे यांचे सगुणाबन कृषी पर्यटन केंद्राचा समावेश करता येईल. नेरळमधील मालेगाव येथे ५५ एकर जागेत पसरलेल्या हे कृषी केंद्र म्हणजे शेती आणि पर्यटन यांचा अचूक मिलाफ आहे.
भडसावळे यांचे वडील हरिभाऊ भडसावळे भाई कोतवालांबरोबर काम करत असत. कर्जत परिसरातील आदिवासींच्या हक्कांसाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी हरिभाऊंनी कार्य केले. त्यांचा वारसा चंद्रशेखर वेगळ्या प्रकारे सामाजिक जाणिवेच्या माध्यमातून चालवत आहेत. १९७०मध्ये दापोलीच्या कोकण कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. अ‍ॅग्रिकल्चर हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चंद्रशेखर यांनी कॅलिफोर्निया येथून ‘फूड सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी’ या विषयाचाही अभ्यास केला. सोबत मत्स्यशेतीचे प्रशिक्षणही घेतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. या काळात त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे साप ठेवलेले होते. त्यांचे विष काढून ते हाफकिन इन्स्टिटय़ूटला देत असत. ते पाहण्यासाठी वेगवेगळ्या शाळांच्या सहली येत. खरे तर येथेच त्यांच्या कृषी पर्यटनाचे बीज रोवले गेले.
शेतीत सातत्याने नवनवीन प्रयोग करणे आणि नव्या संकल्पना कृतीत आणून त्यांचा विकास करणे याचा ध्यास घेतला. त्यातीलच ‘बफेलो राइड’ ही त्यांची संकल्पना. म्हशीच्या पाठीवर बसून नदीच्या पाण्यात फेरफटका मारणे. माशांच्या संगतीत राहून आनंद लुटणे. विशेष म्हणजे विविध माशांना त्यांच्या आवडीचे खाद्य घालण्यापासून त्यांच्याशी खेळण्याची मनमुराद मौज सगुणा बागेत पूर्ण करता येते.
सगुणा बागेतील तलावातील मासे पकडण्याचा आनंद काही औरच. पर्यटकांना तलावाकाठी बसून फिशिंग करता येते. हेच मासे मग चमचमीत मसाल्यात घालून शिजवणे आणि भातासोबत त्याच्यावर ताव मारणे, ही खवय्यांची परमावधी. छोटय़ा कुटुंबापासून ते कॉर्पोरेट कंपन्यांच्या एचआर प्रशिक्षण कार्यक्रमापर्यंतचे पर्यटन सगुणाबागेत आहे.
परिसरातील इतर शेतकरी मजुरांअभावी शेती करणे सोडत होते. त्याला भडसावळे यांनी पर्याय शोधला. त्यांनी प्र. रा. चिपळूणकर यांची शून्य मशागत तंत्राने होणारी भातशेती पाहिली. ही पद्धत कोकणातील मातीला आणि पावसाच्या वेळापत्रकात अनुकूल आहे. ती त्यांनी विकसित केली. ‘एसआरटी’ (सगुणाबाग राइस टेक्नॉलॉजी) असे त्यांनी या शेतीला नाव दिले. या पद्धतीनुसार त्यांच्या शेतात जमीन न नांगरता आज सातवे पीक वावरात उभे आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भातशेतीत नांगरणी आणि चिखलणीमुळे खूपच माती पाण्याबरोबर वाहून जाते. जो देश माती जपू शकत नाही, त्या देशाला भवितव्य नसते. माती वाहून गेल्यामुळे सुपीकता टिकवणारे आणि वाढवणारे सेंद्रिय कर्ब आणि जिवाणू नष्ट होतात आणि जमीन कडक होत जाते. एसआरटी तंत्रामध्ये एकदाच नांगरून पावसापूर्वी ३ फूट रुंदीचे आणि ९ इंच ते एक फूट उंचीचे वाफे तयार केले जातात. पाऊस पडल्यावर त्यावर गवत उगवते. ते तणनाशकाच्या साह्य़ाने जागेवरच मारले जाते. त्यानंतर त्यावर पाण्यात रात्रभर भिजवलेले भाताचे बियाणे योग्य अंतरावर २ ते ४ बिया त्या रुंद वरळ्यावर पेरल्या जातात. योग्य मोजमापासाठी त्यांनी एक फ्रेम तयार केली आहे. भात उगवल्यानंतर परत एकदा निवडक तणनाशक फवारले जाते. भात तयार झाल्यावर ते कापून घेतले जाते. कापण्यापूर्वी मधल्या जागेत वाल, चवळी, मूग, मोहरी यांचे बी पेरले जाते. भाताची मुळे तेथेच शिल्लक राहतात. कडधान्यांना त्या जागेवर ठिबक सिंचनने पाणी दिले जाते. वा सूक्ष्म तुषार सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. तसेच काही वाफ्यांवर वांगी, मिरची, टोमॅटो, मका, फ्लॉवर, कलिंगड अशी उत्पादने घेतली जातात.
अशा पद्धतीने जमीन न नांगरता त्याबरोबर पाणी असल्यास तीनही हंगामांत पिके घेता येतात. पाणी नसल्यास दोन पिके जमिनीतील ओलाव्यावर आणि दवावर घेता येतात. या सर्व पिकांची मुळे जमिनीतच राहतात आणि बराचसा पालापाचोळा ही तेथे पडतो. हे दोन्ही घटक जमिनीत कुजतात. त्यामुळे तेथे पोकळ्या तयार होतात व पावसाचे पाणी जमिनीत जास्त प्रमाणावर मुरते. जोरदार पाऊस जरी झाला तरी जमीन नांगरली नसल्याने वाफ्यातील माती वाहून जात नाही. या पद्धतीने मुलस्थानी जलसंधारण, मृदसंधारण होतेच, याशिवाय जमिनीतील सेंद्रिय कर्ब मोठय़ा प्रमाणात वाढतो आणि सुपीकता आणि उत्पादकता वाढण्यास मदत होते. भातलागवड बी पेरून केल्यामुळे कमी मनुष्यबळात उत्पादन घेता येते. परिणामी उत्पादन खर्चही कमी होतो. भडसावळे यांच्या शेतात कृषिविभागाच्या माध्यमातून वैयक्तिक शेतकरी येऊन या एसआरटी पद्धतीचा लाभ समृद्धी साधतात. वेगवेगळ्या संकल्पना मांडून आणि राबवून भडसावळे शहरी आणि ग्रामीण समाजासाठी काम करत आहेत. प्रत्येकाला परमेश्वराने बुद्धी दिली आहे. त्याचा सुयोग्य वापर  करून समाज, शेती आणि पर्यायाने देश समृद्ध करण्याचा चंद्रशेखर भडसावळे यांचा मानस आहे. त्यांच्या या नवनव्या प्रयोगांचे अनुकरण करून अनेकांनी पुढे पावले टाकली तर या देशाला उज्ज्वल भवितव्य असेल, यात शंका नाही.
राजेंद्र भट