सुरक्षित, समृद्ध जीवनाची हमी
मुंबईत घर घेणे आणि राहणे परवडेनासे झाल्यानंतर सर्वसामान्यांचा मोर्चा ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांकडे वळू लागला. या शहरांतील मूळ वस्ती येथे कित्येक वर्षांपासून नांदत आहे. त्यात नव्याने राहायला आलेल्यांमुळे लोकवस्ती आणखी दाट होऊ लागली. वाढत्या लोकसंख्येमुळे या शहरांतील सुविधांवर ताण वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक समस्या उग्र होत चालल्या आहेत. या समस्यांवर नेमके काय उपाय करता येतील, त्यांचे मूळ कोठे आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’ने ‘लोकसंवाद’ ही लेखमालिका चालवली होती. या लेखमालिकेत पर्यावरण, प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, कायदा-सुव्यवस्था, शहर नियोजन अशा मुद्द्य़ांवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांनी आपली मते मांडली. त्याचाच पुढचा भाग म्हणून ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर यांसह एकूण ठाणे जिल्ह्यतील प्रश्नांबाबत या पट्टय़ातील महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस या शासकीय यंत्रणांतील प्रमुख अधिकाऱ्यांनी या समस्यांवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली..
संजीव जयस्वाल, ठाणे महापालिका आयुक्त
गेल्या वर्षभरात ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरात वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी महापालिकेच्या माध्यमातून अनेक योजना, प्रकल्पांची आखणी करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षांत या प्रकल्पांच्या पूर्ततेचे आव्हान महापालिकेपुढे आहे. हे आव्हान समर्थपणे पेलण्यास महापालिकेस यश येईल याची मला खात्री असली तरी नव्या वर्षांत ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान व्हावा हे उद्दिष्ट आम्ही समोर ठेवले आहे. ठाणे महापालिका परिवहन उपक्रम ही ठाणेकरांसाठी जीवनवाहिनी आहे. या वर्षांत टीएमटीच्या ताफ्यात सुमारे १९० बसेस दाखल होत असून त्यावर खासगी ठेकेदारामार्फत वाहक आणि चालकांची नेमणूक करून ठाणेकरांना दळणवळणाचा समर्थ आणि सक्षम पर्याय उपलब्ध करून देण्याचा यंदा प्रयत्न असणार आहे.
कॅडबरी जंक्शन ते उपवन या पोखरण मार्गाच्या रुंदीकरणासाठी महापालिकेने गेल्या दोन दिवसांपासून अतिक्रमण मुक्तीची मोठी मोहीम हाती घेतली आहे. रस्तारुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे हटवली जात आहेत. येत्या पाच ते सहा महिन्यांत या मार्गावरून कोंडीविरहित प्रवास शक्य होणार आहे. हे करत असताना पोखरण रस्ता क्रमांक दोन, ग्लॅडी अल्वारीस रस्ता, लाल बहादूर शास्त्री मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्तावही समोर आहे. अरुंद रस्ते ही ठाणेकरांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. मूळ शहरात यासंबंधीच्या प्रयोगांना मर्यादा असली तरी अन्य भागातील वाहतुकीच्या धमन्या रुंदावण्याचे आव्हान येत्या काळात पेलावेच लागेल. वेळप्रसंगी त्यासाठी कठोर निर्णय आणि कारवाई हाती घ्यावी लागेल. कळवा, मुंब्रा शहरातील मुख्य रस्त्यांच्या रुंदीकरणासाठीही अशाच प्रकारे मोहीम हाती घ्यावी लागणार आहे. याशिवाय दिवा-आगासन, दिवा-शीळ, टिकुजीनी वाडी, घोडबंदर सेवा रस्त्यासारखे महत्त्वाचे प्रकल्प यंदाच्या वर्षांत हाती घेतले जाणार आहेत. टीएमटी सेवेचे सक्षमीकरण, विजेवर धावणाऱ्या बसेसचा सक्षम पर्याय आणि अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे ‘कोंडीमुक्त’ ठाण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले जाईल, असा विश्वास आहे.

डेब्रिजमुक्तीचा ध्यास
कचरा विल्हेवाटीचा प्रश्न ठाणे शहराची वर्षांनुवर्षांची डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची आखणी गेल्या वर्षी करण्यात आली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करणे, प्राण्यांची विष्ठा, भाजीपाल्यासारखा ओल्या कचऱ्या प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांची यंदा आखणी करण्यात आली आहे. याशिवाय ठाणेकरांना सुरळीत आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी येणाऱ्या पाण्याची योग्य मोजदाद करता यावी स्काडा, मीटर पद्धतीसारखे प्रकल्पांवर काम सुरू करण्यात आले आहे. प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणाचा मोठा प्रकल्प लवकरच हाती घेतला जाणार आहे. ठाणे शहरातील तलावांचे सुशोभीकरण करण्याची कामेही सुरू करण्यात आली आहेत. याशिवाय टाटा कॅन्सर रुग्णालय, संकरा नेत्रालय, नोकरदार महिलांसाठी वसतीगृह असे वेगळ्या धाटणीच्या प्रकल्पांची वाट पुढील काही महिन्यांत मोकळी करून दिली जाणार आहे.