ठाणे : महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईत भूमिपुत्रांवरील बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचा दावा दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यापाठोपाठ आता भाजपच्या नगरसेवकांनी अशाच प्रकारचा दावा करत राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई सुरू असल्याचा आरोप केला. महापौर नरेश म्हस्के यांनी हा आरोप फेटाळून लावत नागरिकांच्या तक्रारीनुसार कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट केले.

ठाणे महापालिका क्षेत्रात करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांच्या मुद्दय़ावरून टीका होऊ  लागताच महापालिका प्रशासनाने बांधकामे जमीनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली असून ही कारवाई अजूनही सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी पणवेलमधील भाजपचे नेते रामशेठ ठाकूर आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नेते दशरथ पाटील यांच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन बेकायदा बांधकामांविरोधात सुरू असलेल्या कारवाईबाबत चर्चा केली. त्या वेळेस पालिकेच्या बेकायदा बांधकामविरोधी मोहिमेत शहरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या बांधकामांवरच हातोडा मारला जात असल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. त्यापाठोपाठ आता राजकीय सूडबुद्धीने ठरावीक म्हणजेच दिवा, खारेगाव, बाळकुम, कोलशेत या भागांतील भूमिपुत्रांवरच्या बांधकामांवर कारवाई केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी मंगळवारी सर्वसाधारण सभेत केला. शहरातील अनधिकृत बांधकामांबाबत काँग्रेस आणि भाजपच्या वतीने लक्षवेधी मांडण्यात आली होती. या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान त्यांनी हा आरोप केला. केवळ ठरावीक भागातच कारवाई होत असून इतर भागांत कारवाईकडे कानाडोळा केला जात असल्याचा दावाही डुंबरे यांनी या वेळी केला.

सूडबुद्धीने कारवाई केली जात नसल्याचा महापौरांचा दावा

अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेकडे  तक्रारी येत होत्या. या बांधकामावरून प्रशासन आणि सत्ताधारी म्हणून आमची बदनामी केली जात होती. तसेच प्रत्येक तक्रारीला उत्तर द्यावे लागत होते. या बांधकामांवर कारवाई करण्याची सूचना प्रशासनाला दिले होते. त्यानुसार ही कारवाई सुरू आहे. त्यामुळे राजकीय सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले.