विद्यमान नगरसेवकांसह अनेक पदाधिकारी भाजपात

अंबरनाथ : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेत दुफळी माजलेली असतानाच, भाजपने शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षप्रवेश देऊन शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेना नगरसेवक रोहित महाडिक यांनी शाखाप्रमुखांसह भाजपत प्रवेश केला असून येत्या काही दिवसांत काही आजी-माजी नगरसेवक पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. या पक्षप्रवेशाच्या निमित्ताने शिवसेनेतील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे.

अंबरनाथ नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येणार आहे. त्यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे. प्रभागांचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले असून लवकरच निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी शिवसेनेत गटबाजीला उधाण आल्याचे चित्र आहे. विद्यमान नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्यातील वाद अजून मिटलेला नाही. त्यामुळे शिवसेनेत निवडणुकीपूर्वीच दुफळी माजलेली असतानाच आता भाजपने शिवसेनेला धक्का दिला आहे.

प्रभाग क्रमांक ३४ चे शिवसेनेचे नगरसेवक रोहित महाडिक यांनी शनिवारी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्यासह शाखाप्रमुख महेश मोरे, नरेश मोरे, विभागप्रमुख नितीन परब या पदाधिकाऱ्यांनीही भाजपत प्रवेश केला आहे.

त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांना हा मोठा धक्का मानला जातो. २०१५ सालच्या पालिका निवडणुकीत रोहित महाडिक यांनी अभिजीत करंजुले यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वी भाजपने अंबरनाथमध्ये शहर अध्यक्षपदाचा तिढा मिटवत पूर्व आणि पश्चिम असे दोन अध्यक्ष नेमले होते. यावेळी माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करून आलेले गुलाब करंजुले यांचे पुत्र अभिजीत करंजुले यांच्याकडे पूर्वेचे अध्यक्षपद दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यावेळी भाजपने शहरातील ५७ जागांपैकी ३० जागा जिंकेल असा दावा केला होता. त्यासाठी आता भाजपने आपले ‘मिशन-३०’ सुरू केले आहे. रवींद्र चव्हाण यांनी शहरात नवीन शहर समितीही नेमली असून निवडणुकांच्या तोंडावर भाजपने सुरू केलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. आणखी काही विद्यमान आणि माजी नगरसेवक तसेच विविध पदाधिकारी लवकरच भाजपत प्रवेश करतील, असा दावाही शहर अध्यक्ष अभिजीत करंजुले यांनी केला आहे.