अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘मुलगी वाढवा, मुलगी वाचवा’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून नगरपालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे दहा हजार रुपयांची रोख रक्कम विशिष्ट बँकेत मुदत ठेवीने ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलगी १८ वर्षांची झाली की तिला या खात्यातून एक लाख रुपयांचा निधी मिळू शकेल, अशी तजवीज केली जाणार आहे.
मुलींसाठी अशा प्रकारची योजना राबविणारी अंबरनाथ ही राज्यातील पहिलीच नगरपालिका असेल, असा दावा नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी केला. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांमुळे राज्यातील वातावरण गढूळ झाले आहे. तसेच राज्यातील स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाणदेखील जास्त असल्याची माहिती मध्यंतरी उघडकीस आली होती. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मुली बचाव’ अभियान हाती घेतले असून यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातही त्यासंबंधी पावले उचलण्यात आली आहेत. या पाश्र्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
मुलीच्या जन्मानंतर लगेचच १० हजार रुपयांची मुदत ठेव ठेवायची आणि ती १८ वर्षांची झाली की सूपूर्द करायची, अशी ही योजना आहे. यासाठी अर्थसंकल्पात विशिष्ट रकमेची तरतूद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे चौधरी यांनी स्पष्ट केले. मुलगी १८ वर्षांची होताच किमान एक लाख रुपयांचा निधी तिला मिळावा, असा नगरपालिकेचा प्रयत्न आहे. या पैशांचा उपयोग तिचे पुढील शिक्षण, लग्न, आरोग्यासाठी मुलीला करता येणार आहे. याचा फायदा शहरातील गोरगरीब कुटुंबांना मिळणार आहे. नगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा ठराव बहुमताने मंजूर झाला आला असून, महिला व बाल संगोपन निधीतून यासाठी ६० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या हा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीला पाठविण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Mar 2015 रोजी प्रकाशित
नवजात मुलीच्या नावे बँकेत दहा हजारांची ठेव
अंबरनाथ नगरपालिकेने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ‘मुलगी वाढवा, मुलगी वाचवा’ या अभियानाची घोषणा केली आहे.
First published on: 07-03-2015 at 12:07 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath corporation proposal to deposit 10000 in the name of newborn daughter