डोंबिवलीप्रमाणे यंदा अंबरनाथमधील नववर्ष स्वागत यात्रेतही महिलांनी पुढाकार घेतला असून सध्या त्याची जोरदार तयारी सुरू आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या यात्रेसाठी अंबरनाथमधील तब्बल दहा महिला मंडळे व पंधरा भजनी मंडळे सहभागी होणार असल्याने संपूर्ण यात्रेवर महिलांचाच वरचष्मा राहणार आहे.
सुयोग महिला मंडळ, योगिनी महिला मंडळ, ज्येष्ठ महिला मंडळ, विरंगुळा मंडळ, ब्राह्मण सभा महिला मंडळ आदी प्रमुख मंडळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत. दर वर्षी वेगवेगळी संकल्पना घेऊन पुढे येणारे अंबरनाथमधील सर्वात मोठे व चाळीस वर्षे जुने सुयोग महिला मंडळ यंदाही आकर्षक देखावा सादर करणार आहेत.
टीव्हीवरील गाजलेल्या मालिकांच्या व्यक्तिरेखा व त्यातील महत्त्वाचे क्षण साजरे करण्याची संकल्पना दर वर्षी मांडण्याची परंपरा याही वर्षी त्यांनी कायम राखली आहे. या वर्षी छोटय़ा पडद्यावर गाजत असलेल्या ‘जय मल्हार’ मालिकेची संकल्पना त्यांनी ठरवली असून या मालिकेतील खंडोबा, बाणाई, म्हाळसा, शंकर-पार्वती आदी सुप्रसिद्ध पात्रांच्या व्यक्तिरेखा या मंडळातील महिला सादर करणार आहेत. या सादरीकरणासाठी येणारा आठ ते दहा हजारांपर्यंतचा खर्च हा महिला मंडळाच्या माध्यमातून व लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. येथील योगिनी महिला मंडळ व आपले आरोग्य योग वर्ग या मंडळातील चाळीस महिलांचे लेझीम पथक तयार करण्यात आले असून संपूर्ण यात्रेत महिलांच्या लेझीम पथकाचे खेळ हा आकर्षणाचा विषय असणार आहे. यंदा या संपूर्ण यात्रेची मुख्य संकल्पना ही ‘स्वच्छ अंबरनाथ व सुंदर अंबरनाथ’ आहे, अशी माहिती योगिनी महिला मंडळाच्या इंदू पाताडे यांनी दिली.

शहरातील सांस्कृतिक कार्यक्रम व सण साजरे करण्याची परंपरा आम्ही उत्स्फूर्तपणे कायम राखली असून नववर्ष स्वागत यात्रा भव्य स्वरूपात साजरी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. यंदाही संपूर्ण यात्रेत विविध देखावे, लेझीम पथके यांत महिला अघाडीवर राहणार आहेत. महिलांची दहा मंडळे व इतर महिला भजनी मंडळे एकटय़ा अंबरनाथ शहरात असून एवढय़ा मोठय़ा संख्येने नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणारे अंबरनाथ एकटेच शहर असेल.
-संध्या म्हात्रे, सदस्य, सुयोग महिला मंडळ