अंबरनाथ नगरपालिकेच्या दुसऱ्या सभेत गोंधळ झाल्याने सभा दोन तासांसाठी स्थगित करण्याची नामुष्की सोमवारी ओढवली होती. या गोंधळासाठी घनकचरा व्यवस्थापनाचा विषय कारणीभूत ठरला आहे.पालिकेच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत २५० कोटींच्या मंजूर विषयांना जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिली होती. मात्र सोमवारी पालिकेत उशिरा झालेल्या विशेष सभेत स्थगित असलेला घनकचरा व्यवस्थापनाचा विषय पुन्हा चर्चेला आल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी या विषयाला जोरदार हरकत घेतली. अखेर ही सभा दोन तास स्थगित करण्यात आली होती. नंतर विषयाला प्रशासनाच्या नियमानुसार मंजुरी देत असल्याची जबाबदारी घेतल्यावर सभा सुरू झाली.अंबरनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्याच सर्वसाधारण सभेत २५० कोटींच्या ५३४ विषयांना सभागृहात चर्चा न करता थेट मंजुरी देण्यात आली होती. अखेर पालिकाभेटीवर आलेल्या जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी आर्थिक तरतूद नसताना एवढय़ा विषयांना मंजुरी का दिली, असा सवाल अधिकाऱ्यांना करीत सभेतील सर्व विषयांना स्थगिती दिली होती. याच विषयांपैकी एक विषय असलेल्या घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका संपत आल्याने या ठेकेदाराने शहरातील कचरा उचलण्यास मनाई केली होती. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचा शहरात गंभीर प्रश्न उपस्थित होणार होता. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी घनकचरा व्यवस्थापनाच्या विषयासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा घनकचरा व्यवस्थापनचा विषय जिल्हाधिकारी यांनी स्थगिती दिलेल्या विषयांपैकी एक विषय होता. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला बगल देत पालिका प्रशासन परस्पर विषय मंजूर करत असून काँग्रेस नगरसेवक पंकज पाटील आणि प्रदीप पाटील यांनी याला आक्षेप नोंदवला. यामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे यांनी सभा तहकूब केली. मात्र संबंधितांशी चर्चेनंतर शासनाच्या नियमानुसार हा विषय मंजूर करत असल्याचे प्रशासनाने सांगितले.त्यानंतर निविदा मागविण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या वेळी प्रभागातील घंटागाडय़ा छोटय़ांऐवजी मोठय़ा असाव्यात अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambernath municipal mess on solid waste
First published on: 02-09-2015 at 02:18 IST