अंबरनाथचा काळा, लाल, निळा भात यंदा बाजारात

नावीन्यपूर्ण उपक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा; अस्मानी संकटातही भात पीक तग धरून

नावीन्यपूर्ण उपक्रमातून शेतकऱ्यांना आर्थिक फायदा; अस्मानी संकटातही भात पीक तग धरून

बदलापूर : मजुरी आणि उत्पादन खर्च वाढल्याने भातशेती परवडत नाही अशी ओरड करणाऱ्या शेतकऱ्यांना अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांनी भातशेतीतील नावीन्यपूर्ण उपक्रमातून चोख उत्तर दिले आहे. तालुक्यात कृषी विभागाच्या मदतीने यंदा वैशिष्टय़पूर्ण अशा काळा, लाल आणि निळय़ा भाताची लागवड केली. 

गेल्या चार महिन्यांत विविध अस्मानी संकटांतही या भात पिकाने तग धरला आणि सध्या हे पीक काढणीला आले आहे.  अंबरनाथ तालुक्यातील औषधी गुणधर्म असलेला काळा, लाल आणि निळा भात बाजारात येणार आहे. त्यातून पारंपरिक भात पिकापेक्षा नक्कीच अधिकचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळणार आहे. ठाणे जिल्ह्यातील लागवडीखालील ६६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ५४,५०० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. भात शेतीसाठी लागणारे महागडे मजूर आणि उत्पादन खर्च वाढल्याने ही शेती परवडत नसल्याची ओरड शेतकरी करतात. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षी काळय़ा भाताचे बियाणे तयार करण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. लागवडीसाठी बिजोत्पादन प्रक्रिया उन्हाळय़ात पूर्ण करून २०२१च्या खरीप हंगामात काळय़ा भाताचे बियाणे शेतकऱ्यांना देण्यात आले. त्यासोबतच लाल आणि निळय़ा भाताचे बियाणेही शेतकऱ्यांना देण्यात आले.

यंदाच्या मोसमात सुरुवातीला पावसाने ओढ दिली. जुलैच्या पावसाने भाताला तारले. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात भाताचे पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे केले होते. त्यातूनही जिल्ह्यात भाताने तग धरला आहे. त्यामुळे यंदा अंबरनाथ तालुक्यात काळा, लाल आणि निळ्या भाताचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळणार आहे. या तीन रंगांच्या भात वाणाचे उत्पादन कमी असले तरी त्यामुळे इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती अंबरनाथचे कृषी सहायक सचिन तोरवे यांनी दिली आहे. कृषी विभाग भात विक्रीसाठीही सहकार्य करणार असून त्याची तयारी सुरू असल्याचेही तोरवे यांनी सांगितले आहे.

निळा भात लागवड करण्याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सध्या लोंब्या सर्वसाधारण भातापेक्षा मोठय़ा असून दाणे चांगले भरले आहेत. निळ्या भातापासून पेंढाही अधिक मिळणार असून त्यामुळे पुढील वर्षी हे क्षेत्र वाढवण्याचा विचार आहे.

मदन भाईर, शेतकरी,

किंमत जास्त, तरी मागणी अधिक

* काळा, निळा, लाल तांदूळ आरोग्यासाठी उपकारक असून अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे मधुमेहावर गुणकारी असल्याचे बोलले जाते.

* ईशान्य भारतातील राज्यांतून येणाऱ्या या भाताची किंमत जास्त असली तरी  ग्राहकांची त्याला मागणी आहे.  *   बाजारात या भाताचा प्रतिकिलो दर १०० ते ३०० रुपयांपर्यंत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ambernath s black red blue rice is in the market this year zws

Next Story
काय, कुठे, कसं?
ताज्या बातम्या