अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनात अमित शहा यांचे प्रतिपादन
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारधारेवर शंका घेत त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना देशातील पुढच्या पिढय़ा कधीच माफ करणार नाहीत, असे मत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी ठाण्यात व्यक्त केले. सावरकर यांचे विचार कालबाह्य़ झालेले नसून ते आजही राष्ट्रासाठी पथदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित २९ व्या अखिल भारतीय सावरकर साहित्य संमेलनाचे उद्घाटन शुक्रवारी अमित शहा यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी कोटय़वधी लोकांच्या मनामध्ये राष्ट्रभक्ती जागृत केली असून त्यांचे साहित्य अंधारामध्ये उजेड दाखविण्याचे काम करते.
अनेकांना पद्म, पद्मश्री, भारतरत्न असे पुरस्कार मिळाले आहेत. पण, देशाच्या जनतेने स्वत:हून सावरकर यांच्या नावापुढे वीर अशी उपमा लावली आणि ते संपूर्ण जगाने मान्य केले. या उपमेसाठी कोणताही प्रस्ताव, स्वाक्षरी मोहीम किंवा राजकीय पक्षांना पाठपुरावा करावा लागला नाही. त्यामुळे जनतेकडून वीर उपमा मिळविणारे सावरकर हे एकमेव व्यक्ती आहेत. कर्तृत्व पाहून जनतेने त्यांना देऊ केलेली उपमा सर्वात मोठी असल्याचे त्यांनी सांगितले. चीन, पाकिस्तान इशान्य भारत आणि बांगलादेश यांच्याबाबत सावरकरांनी जे भाकीत वर्तवले होते, त्यावर देशाने योग्यवेळी विचार केला असता तर देशाला संकटांचा सामना करावा लागला नसता, असेही त्यांनी सांगितले. भाजप सरकारने अंदमानमध्ये पेटवलेली ज्योत नष्ट करण्याचे काम काँग्रेस सरकारने केले. मात्र, भाजप पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्या ठिकाणी ज्योत पेटविण्यात आली आहे, ही माहितीही त्यांनी दिली.
देशभरात संमेलन भरवा
सावरकर हे लेखक आणि योद्धा होते. त्याचबरोबर जन्मजात देशभक्त, भाषाशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यामुळे त्यांची विचारधारा पुढे नेण्याचे काम करणारे हे साहित्य संमेलन महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका तर देशभरात अशी संमेलने आयोजित करा, असा सल्लाही शहा यांनी दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न देण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्याची मागणी संमेलनाचे निमंत्रक विद्याधर ठाणेकर यांनी केली. तर हीच मागणी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही केली.
देशाची राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर संपूर्ण देश चालतो. त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची विचारधारा मानणारे भाजप केंद्रामध्ये सत्तेवर आहे. त्यामुळे सावरकर आणि आंबेडकर अशा दोन विचारधारांवरच देश चालणार असून अन्य विचारधारा अस्त पावल्या आहेत, असे विधान संमेलनाध्यक्ष रमेश पतंगे यांनी केले.
