ठाणे : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केल्याप्रकरणी अनंत करमुसे यांच्याविरोधात वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून या प्रकरणाच्या तपास कामात करमुसे यांनी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. तसेच करमुसे यांनी स्वच्छ हेतूने याचिका दाखल केलेली नसल्याचे निरीक्षण नोंदवित त्यांची ट्वीट आणि फेसबुक पोस्ट हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेबाहेर असल्याचेही उच्च न्यायालयाने यापुर्वीच नमूद केले आहे. यामुळे करमुसे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, या संदर्भात अनंत करमुसे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला असता, दोषारोपपत्राची कागदपत्रे अद्याप मिळालेली नसून त्यावर आता भाष्य करणे उचित ठरणार आहे. तसेच उच्च न्यायालयात जी याचिका दाखल केली होती, त्यासंदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न अवस्थेतील माॅर्फ केलेले छायाचित्र अनंत करमुसे यांनी समाजमाध्यमांवर प्रसारीत केले होते. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी ६ एप्रिल २०२० रोजी भादंवि कलम २९२, ५०० तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६६ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्य़ातील दोषारोपपत्र वर्तकनगर पोलिसांनी ठाणे न्यायालयात नुकतेच दाखल केले असून करमुसे यांना समन्सपत्र बजावण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये पोलिसांनी करमुसे यांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले आहेत. करमुसे यांच्या जप्त केलेल्या मोबाईलमध्ये जितेंद्र आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र सापडले होते.

हेही वाचा : डोंबिवली जवळील संदप गावातील केबल व्यावसायिकाची स्पर्धकांच्या त्रासाला कंटाळून रेल्वे मार्गात आत्महत्या

तसेच करमुसे यांनी पोलिसांना तपासात कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नसल्याचे या आरोपत्रात नमूद करण्यात आले आहे. करमुसे यांनी स्वतःच्या मोबाईलमधुन स्वतः च्या फेसबुक अकाउंटवरून आव्हाड यांचा छेडछाड केलेला अर्धनग्न अवस्थेतील अश्लिल छायाचित्र प्रसारित केल्याचा आरोप होता. त्यामुळे त्यांचा मोबाईल जप्त करून न्यायवैद्यक प्रयोगशाळा पाठविला असता, जातीद्वेष-धर्मद्वेष, व्यक्तीद्वेष असे २७ प्रकारच्या द्वेष पसरविणार्या पोस्ट करमुसे यांनी आपल्या वैयक्तिक अकाउंटवरून फेसबुक व ट्विटरवर अपलोड केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा : ठाणे : विद्युत मनोरा हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक

अनंत करमुसे हे जितेंद्र आव्हाड यांना गेली पाच वर्षे लक्ष्य करीत असून त्यांना या कामी अन्य कोण साह्य करीत आहे का? याचा शोध घेण्यासाठी अनंत करमुसे यास सुमारे ५ वेळा समजपत्र पाठवूनही त्याने पोलिसांना सहकार्य केले नसल्याचेही या दोषारोपपत्रात पोलिसांनी नमूद केले आहे. शरद पवार यांचा शरदद्दीन आणि जितेंद्र आव्हाड यांचा जितुद्दीन असा उल्लेख असलेले छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केले होते. हे सर्व पुरावे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहेत. दरम्यान, यापूर्वी करमुसे यांनीच दाखल केलेल्या याचिकेवर दिलेल्या निकालात उच्च न्यायालयाने अनंत करमुसे यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत.

तसेच, आपल्याविरोधात विकृत ट्वीट्सबद्दल गुन्हा दाखल आहे, ही बाब तसेच आपले विकृत ट्विट्स याची माहिती याचिका दाखल करताना उच्च न्यायालयापासून लपवून ठेवल्याबाबतही उच्च न्यायालयाने आपल्या निकालपत्रात स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. २०१६ पासून करमुसे हा जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करीत होता. २०१८ मध्ये आव्हाड यांनी करमुसे यांना ब्लॉक केले होते. आव्हाड हे करमुसे याला प्रतिसाद देत नसतानाही किंवा करमुसे याला ब्लॉक केले असतानाही करमुसे यांनी “.जितेंद्र आव्हाड यांनी मला ब्लॉक केले आहे. मी आपणाला आवाहन करतो की त्यांना वेगळ्या माध्यमातून लक्ष्य करावे,” असे आवाहनही करमुसे याने आपल्या ट्वीटर अकाउंटवरून १२ जुलै २०१८ रोजी केले असल्याचे पोलिसांनी आपल्या तपासादरम्यान शोधले आहे.

हेही वाचा : बारमध्ये बाहेरील दारू आणल्याने व्यवस्थापकाची तरुणाला मारहाण

हे सर्व ट्विट्स उच्च न्यायालयात जेव्हा मांडण्यात आले तेव्हा, ही माहिती करमुसे याने दडवून ठेवली असल्याने . याचिकाकर्त्याचा हेतू स्वच्छ आणि प्रामाणिक नसल्याचे निरीक्षणही आपल्या निकालपत्रातील परिच्छेद क्रमांक २७ आणि २८ मध्ये उच्च न्यायालयाने नमूद केले आहे. आव्हाड यांचे अर्धनग्न छायाचित्र न्यायालयासमोर आल्यानंतर ” हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? ” असा प्रश्न विचारत माणूस सुशिक्षित असू शकतो. पण, सुसंस्कृत नाही, अशी गंभीर टिप्पणी करीत सदरचे छायाचित्र न्यायाधीशांनी बाजूला ठेवले आहे.