माणसात उपजत असलेले प्राण्यांबद्दलचे कुतूहल आणि पशुप्रेम बाजारपेठेने ताडले. जागतिकीकरणाच्या लाटेनंतरत परदेशी प्रजातींकडे पशुपालक अधिक आकर्षित झाले. घराच्या आसपास दिसणाऱ्या श्वानांपेक्षा वेगळे दिसणारे, वेगळे गुणधर्म असणारे श्वान पशुप्रेमींच्या अधिक पसंतीस उतरले. त्यामध्ये काही भारतीय स्थानिक प्रजाती गेली अनेक वर्षे दुर्लक्षित झाल्या. अगदी सत्तरच्या दशकापर्यंत घराच्या आसपास असलेल्या श्वानाला किंवा मांजराला खाणे घालणे. फारच हौशी घर असले, तर दाराबाहेर घोटाळणाऱ्या श्वानाच्या गळ्यात पट्टा आणि साखळी अडकवून मालकी हक्क प्रस्थापित करणे एवढय़ापुरतीच भारतीय मानसिकता मर्यादित होती. परिणामी भारताचे मूळ रहिवासी असलेल्या अनेक श्वान प्रजाती दुर्लक्षित राहिल्या.

भारतीय प्रजातींचे वैशिष्टय़ काय?

भारताच्या भौगोलिक विविधतेनुसार तेथील हवामान, खाणे, जीवनशैली स्वीकारून प्रजाती देशभरातील विविध भागांत पसरल्या आहेत. त्यामुळे या प्रजातींची प्रतिकारशक्ती अधिक असते, गरजाही तुलनेने कमी असतात. स्थानिक परिस्थितीशी नाळ जुळलेली असल्यामुळे तेथील होणारे बदलही या प्रजाती तुलनेने लवकर स्वीकारतात. त्याचप्रमाणे तेथील गरजांनुसार त्यांची गुणवैशिष्टय़े निर्माण झालेली असतात. त्यामुळेच देशाच्या सीमा सुरक्षा दलांकडून राजपलयम किंवा हिमालयाच्या परिसरातील स्थानिक श्वान प्रजातींचा अधिक वापर केला जातो.

स्थानिक प्रजातींची मागणी वाढली

पाळीव पशूंसाठी असलेल्या मोठय़ा बाजारपेठेबरोबरच त्यांचा अभ्यास करणे, नोंदी ठेवणे, पशुप्रेमाला शास्त्रीय आधाराची जोड देणे हे संस्कार भारतात खूप अलीकडच्या काळात रुजायला लागले. त्यामुळे भारतातील स्थानिक श्वानांच्या वंशावळींची फारशी नोद झाली नाही किंवा निगुतीने त्यांचे पालन केले नाही. आता मात्र हळूहळू या स्थानिक श्वानांच्या आणि त्यांच्या प्रसारकर्त्यांच्या लढय़ाला यश येऊ लागले आहे. परदेशी प्रजातींइतकीच स्थानिक श्वानप्रजातींबाबत कुतूहल वाढले आहे. त्यामुळे आता अनेक व्यावसायिक ब्रीडर्सही स्थानिक प्रजातींचे ब्रीडिंग करत आहेत. या प्रजातींना परदेशी श्वानांप्रमाणेच आता किंमतही मिळू लागली आहे.

काही प्रजातींची ओळख

  • इंडियन परीहा किंवा इन डॉग – साधारणपणे भारतभरात सगळीकडे या प्रजातींचे श्वान दिसतात. आपल्याकडे दिसणाऱ्या भाटक्या कुत्र्यांप्रमाणेच साधारणपणे यांचे रंग रूप असते. मात्र तरीही ही प्रजाती पूर्णपणे वेगळी आहे. मातकरी किंवा काळ्या रंगाचे हे श्वान असतात. काटकपणा हे या प्रजातीचे वैशिष्टय़ मानले जाते.
  • राजपलयम – ही दक्षिण भारतातील प्रजाती आहे. शुभ्र पांढरा रंग, गुलाबी नाक, उंच, लांब पाय आणि चणीने थोडे बारीक असे हे श्वान राजघराण्यांमध्ये पूर्वी पाळले जायचे. अस्वलांच्या शिकारीसाठी या श्वानांचा उपयोग पूर्वी केला जात असल्याचे उल्लेख आढळतात.
  • मुधोळ हाऊंड, कारवान हाऊंड किंवा पश्मी – महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र पदेश येथे प्राधान्याने आढळणारी ही प्रजाती. शिकारीसाठी किंवा राखणीसाठी हा श्वान पूर्वी पाळला जायचा. मातकट, पांढरा, काळा, करडा अशा रंगांत हे श्वान मिळतात.
  • रामपूर ग्रे हाऊंड किंवा नॉर्थ इंडियन ग्रे हाऊंड – ताकद ही या श्वानाची ओळख आहे. त्याचा जबडा आणि पायात अधिक ताकद असते. त्यामुळे शिकारीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. उत्तर भारतात ही प्रजाती प्रसिद्ध आहे.
  • कन्नी – याचे मूळ स्थान तमिळनाडू. मालकाशी अत्यंत इमानदार राहणारी आणि पाळीव म्हणून घरात पटकन मिसळून जाणारी प्रजाती म्हणून या श्वानांची ओळख आहे. साधारणपणे काळ्या रंगात हे श्वान आढळतात.
  • इंडियन माऊंटन डॉग – हा हिमालयाच्या परिसरातील श्वान. तेथील हवामानाच्या गरजेनुसार केसाळ आणि ताकदवान. हिमाचल प्रदेश, कश्मीर, उत्तराखंड या भागांत संरक्षणासाठी हा श्वान पाळला जातो. ‘गड्डी कुत्ता’ असे याचे स्थानिक नाव आहे.
  • कोंबई – ही दक्षिण भारतात आढळणारी प्रजाती. राखणीसाठी हे श्वान पाळले जात असत. राजपलयमपेक्षा थोडे उंचीला कमी, पण ताकदवान अशी ही प्रजाती आहे. याशिवाय कुमाऊॅन माऊंटन डॉग, दुर्मीळ होत चाललेला बखरवाल डॉग, मध्य भारतात आढळणारा ‘पांडीकोना’ या प्रजातींच्या नोंदी झाल्या आहेत. यातील राजपलयम, कुमाऊॅन माऊंटन, मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड यांना मागणी वाढली आहे. भारतीय स्थानिक प्रजातींबाबत पशुपालकांकडून विचारणा करण्यात येते असे निरीक्षण ब्रीडर्सनी नोंदवले आहे.