ठाणे : ठाण्यातील मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांची काही वर्षांपूर्वी हत्या झाली होती. या हत्येच्या प्रकरणात जमील शेख यांचे कुटुंबिय राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांचा सहभाग असल्याचा आरोप करत आहे. बुधवारी याच प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या पत्रकार परिषद घेणार आहे. त्याबाबत त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळावे, असेही त्या म्हणाल्या आहेत. सोमवारी जमील शेख यांच्या कुटुंबियांनी न्याय हवा असे म्हणत राबोडी ते तीन हात नाका चालत मोर्चा काढला होता. त्यानंतर तेथून ते वाहनाने मंत्रालयापर्यंत गेले होते. आता दमानिया या पत्रकार परिषद घेणार असल्याने मुल्ला यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ठाण्यातील राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. ते राबोडी परिसरातून दुचाकीवर जात असताना, त्यांच्या डोक्यात गोळी झाडण्यात आली होती. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी जमील शेख यांच्यावर गोळीबार केला होता आणि त्यानंतर ते फरार झाले होते. जखमी अवस्थेत जमील शेख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तर, गुन्ह्याचा तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरु होता. या गुन्ह्यात गोळी झाडणारा आणि त्याच्यासोबत असलेल्या दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात मुख्य आरोपी ओसामा याचा शोध पोलिसांकडून सुरू होता.

पोलिसांनी ओसामा याला उत्तर प्रदेशमधून अटक केली. काही दिवसांपूर्वी जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. जमील यांच्या हत्येची सुपारी नजीब मुल्ला देणार असल्याचे खुद्द ओसामा याने चित्रफित म्हटले आहे. ही चित्रफित पोलिसांनी लपवून ठेवली होती आणि ती आमच्या हाती लागली आहे, असा दावा खुषनुमा यांनी केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नजीब मुल्ला यांनी ठाण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेऊन जमील शेख यांचे आरोप फेटाळले होते. तसेच एक चित्रफीत दाखविली होती. सोमवारी जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राबोडी ते तीन हात नाका असा पायी मोर्चा काढला होता. तसेच तिथून पुढे ते मंत्रालयाच्या दिशेने निघाले होते. आता याच प्रकरणात दमानिया यांनी पत्रकार परिषद घेणार असल्याचा दावा केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, अजित पवारांचे निकटवर्तीय नजीब मुल्ला यांच्यावर तात्काळ कारवाई करा ही मागणी करत, जमील शेख यांच्या कुटुंबियांसोबत मी उद्या (बुधवारी) सकाळी १०.३० वाजता माझ्या घरातून पत्रकार परिषद घेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या कुटुंबियांना आश्वासन दिले होते. ते त्यांनी तात्काळ पूर्ण करावे, असे त्यांनी म्हटले आहे.