‘लोकसत्ता’तर्फे ‘आणखी पु.ल.’ विशेषांकाचे ठाण्यात प्रकाशन; आजपासून सर्वत्र उपलब्ध

कोणत्याही घटनेचे तसेच व्यक्तीचे हुबेहूब चित्र आपल्या लेखणीतून उभे करीत वाचकांच्या, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अपरिचित बाबींसह अप्रकाशित भाषणे आणि पत्रांचा बहुमोल ठेवा असलेल्या साहित्याचा अनुभव घेण्याची संधी शनिवारी ठाणेकरांना मिळाली.

‘लोकसत्ता’तर्फे ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील टिपटॉप प्लॉझा येथे झाले. यानिमित्त ‘शब्दवेध’ निर्मित ‘अपरिचित पु.ल.’ या पुलंच्या साहित्यावर आधारित (पान ३ वर) (पान १ वरून) अभिवाचन कार्यक्रमाने उपस्थित रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

परांजपे स्कीम्सचे अमित परांजपे, चितळे मिठाईवालेचे प्रमोद सरवणकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे अतुल परब, प्रसिद्ध गायक चंद्रकांत काळे, अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी आणि अभिनेते सुनील अभ्यंकर यांच्या हस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले.

‘अपरिचित पु.ल.’ हा विशेष कार्यक्रम प्रसिद्ध गायक चंद्रकांत काळे, अभिनेते-लेखक गिरीश कुलकर्णी आणि अभिनेते सुनील अभ्यंकर यांनी सादर केला. ‘व्यायाम आणि व्यक्ती या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्यानंतर पुलंनी विविध उदाहरणांद्वारे त्यावर केलेल्या विनोदी भाष्याचा अनुभव प्रेक्षकांना ‘बेटकुळ्या’ या ललित लेखाच्या अभिवाचनातून मिळाला.’ ‘बरं आहे’ या शब्दाचा रोजच्या संवादात स्वभाव आणि घटनेनुसार बदलत जाणारा उच्चार आणि त्याचा लहेजा यावर पुलंनी मिश्कीलपणे लिहिलेल्या ललित लेखाचे कलाकारांनी यावेळी अभिवाचन केले. ‘वाङ्मयाचा गाळीव इतिहास’ या लेखाच्या सादरीकरणावेळी प्रेक्षकांमध्ये हास्याचा फवारा उमटला. ‘रस्ते’ या लेखाद्वारे पुलंनी गाव आणि रस्ते यावर विविध उदाहरणांसह केलेल्या भाष्याने प्रेक्षकांच्या मनाला भावनिक साद घातली. ‘विझे दिवसाचा दिवा सूर्य बुडाला, मेघ आकाशी जमले लोभ चंद्राशी जडला’ हा रवींद्रनाथ टागोर यांच्या बंगाली कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद गिरीश कुलकर्णी यांनी सादर केला. पुलंनी दया पवार यांच्या ‘बलुतं’ या कांदबरीवर लिहलेल्या अभिप्रायाचे देखील कलाकारांकडून वाचन करण्यात आले. यावेळी पुलंची अपरिचित गीते चंद्रकांत काळे यांनी सादर केली. त्यांना आदित्य मोघे यांनी हार्मोनियमची आणि यश सोमण यांनी तबल्याची साथसंगत केली. ‘निरोप शांतीनिकेतनचा’ या लेखाच्या अभिवाचनाद्वारे निसर्गाचा रम्य अनुभव घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली. तसेच यावेळी सादर करण्यात आलेल्या ‘थँक्यू यम यम’ या लेखाद्वारे रोजच्या जगण्यात नवा आनंद कसा शोधावा, यावर पुलंनी एका पात्रावर लिहलेल्या लेखाचे कलाकारांनी वाचन केले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी टिपटॉप प्लाझाचे रोहितभाई शहा हे देखील उपस्थित होते.

पुलंची पत्रे

‘शब्दवेध’ निर्मित ‘अपरिचित पु.ल.’ या कार्यक्रमात पुलंनी कवी बा.भ.बोरकर यांच्यापासून ते अगदी संस्कृत पंडित गणेशशास्त्री जोशी यांना लिहलेल्या विविध पत्रांचे यावेळी वाचन करण्यात आले. या पत्रांतून पु.ल.देशपांडे यांच्या विनोदी लेखणीचा प्रत्यय उपस्थित रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला.

मुख्य प्रायोजक- परांजपे स्कीम्स

सहप्रायोजक- चितळे बंधू मिठाईवाले, स्टोरीटेल, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.

‘लोकसत्ता’तर्फे प्रकाशित ‘आणखी पु. ल.’ या विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी ठाण्यातील हॉटेल टिपटॉप प्लाझा येथे झाले. या वेळी उपस्थित मान्यवर. डावीकडून लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लि.चे अतुल परब, चितळे मिठाईवाले यांचे प्रमोद सरवणकर. ‘शब्दवेध’ निर्मित ‘अपरिचित पु. ल.’ या कार्यक्रमामधील तबलावादक यश सोमण, अभिनेते सुनील अभ्यंकर, गिरीश कुलकर्णी, परांजपे स्कीम्सचे अमित परांजपे, ‘अपरिचित पु. ल.’ कार्यक्रमाचे संकलक आणि दिग्दर्शक चंद्रकांत काळे, हार्मोनियम वादक आदित्य मोघे.